महिलांच्या वाट्यातील अनेक अडचणी दूर करून अनेक तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र, अजूनही काही सामाजिक रितींमुळे अनेक महिलांना शाळेबाहेरच बसावं लागत असल्याचं चित्र वारंवार समोर येतंय. तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोईअम्बतूर जिल्ह्यातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थीनीला मासिक पाळी आल्याने वर्गाबाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मासिक पाळीमुळे तिला परीक्षा देता आली नाही. हा प्रकार उजेडात आल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी शाळेच्या या कृतीवर आक्षेप घेतला. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका मुलीला ५ एप्रिल रोजी पहिल्यांदाच मासिक पाळी आली. तर, ७ एप्रिल रोजी तिचा विज्ञानाचा पेपर होता. मात्र, तिला या पेपरला न बसवता वर्गाबाहेर बसवण्यात आलं. ८ एप्रिलला तिचा सामाजिक शास्त्राचा पेपर होता. तेव्हाही तिला वर्गाबाहेर बसवण्यात आलं.
आईने मोबाईलमध्ये कैद केली घटना
अखेर तिने ही घटना तिच्या आईला सांगितली. तिच्या आईने शाळेत जाऊन याविषयी चौकशी केली असता तिला खरंच वर्गाबाहेर बसवण्यात आल्याचं सिद्ध झालं. तिच्या आईनेही तिच्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे. त्यामुळे बुधवारी रात्री ही घटना सोशल मीडियावरही व्हायरल झाली.
या व्हिडिओमुळे संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी पोल्लाची उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची मागणी केली आहे. या कथित भेदभावाबद्दल शाळा अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देताना कोइम्बतूरचे जिल्हाधिकारी पवनकुमार जी गिरियप्पनवर म्हणाले, याप्रकरणी कोइम्बतूर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शाळांच्या निरीक्षकांना सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे आणि “शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.