कृष्ण भक्तीत लीन असलेल्या एका तरुणीने आयुष्यभर कान्हासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुणीने भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न करून टाकलं आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही तरुणी वृंदावन येथे गेली होती. तिथेच तिने भगवान श्रीकृष्णासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजेच तिच्या आई-वडिलांनीसुद्धा तिच्या या निर्णयाला सहमती दर्शवली. त्यानंतर आई-वडील आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत या तरुणीने सर्व हिंदू रितीरिवाजाप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न केलं.
या लग्नाची संपूर्ण तयारी ही सामान्य लग्नाप्रमाणेच होते. सर्व रितीरिवाज, भटजी, मंडप, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पाठवणीच्या कार्यक्रमावेळी ही तरुणी श्रीकृष्णाची मूर्ती सोबत घेऊन कारमध्ये बसून नातेवाईकांच्या घरी गेली. या तरुणीने एमएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं असून तिचं नाव रक्षा असं आहे. ती सध्या एलएलबीचं शिक्षण घेत आहे.
श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत केलं लग्न
रक्षा ही औरैयामधील बिधुनाजवळच्या भरथना रोड येथील रहिवासी असलेल्या रणजीतसिंह सोळंकी यांची कन्या आहे. रणजीतसिंह हे कवी आहेत. त्यांची ३१ वर्षीय मुलगी रक्षा सोळंकी ही भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन आहे. त्यामुळेच तिने श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत लग्न केलं आहे. तिने श्रीकृष्णाला तिचे आराध्य मानलं आहे. जुलै २०२२ मध्ये ती वृंदावन येथे गेली होती. तेव्हापासूनच तिने हट्ट केला की, तिला श्रीकृष्णासोबत लग्न करायचं आहे.
हे ही वाचा >> “बाबरी मशिदीची गरज नाही, आम्हाला आता…” आसामच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक निवडणुकीसाठी दंड थोपटले
“श्रीकृष्ण स्वप्नात आले आणि…”
रक्षाने सांगितलं एक श्रीकृष्ण एकदा तिच्या स्वप्नात आले होते. स्वप्नात तिचा कृष्णाशी विवाह झाला होता. रक्षाची कृष्णभक्ती पाहून तिचे आई-वडील आणि कुटुंबियांनी तिच्यासमोर माघार घेतली आणि तिच्या श्रीकृष्णासोबतच्या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी स्वतः तिचे हात पिवळे केले. रविवारी या तरुणीने श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत सात फेरे घेतले आणि तिचं जीवन कृष्णाप्रती समर्पित केलं.