Girl Running With Books Video: उत्तर प्रदेशमध्ये बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवले जात असल्याचा मुद्दा सध्या देशबरात चर्चेत आला आहे. या मुद्द्यावरून प्रसंगी वादही उद्भवले असून त्यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. न्यायालयाने मंगळवारी अशा कारवायांवरून उत्तर प्रदेश सरकारला खडे बोल सुनावले असून आर्थिक नुकसानभरपाईचेही आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील अशाच एका कारवाईदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही त्याची दखल घेतली आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये २१ मार्च रोजी करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यानचा आहे. या परिसरात अतिक्रमण केलेल्या घरांवर कारवाई करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला असला, तरी या घरांना नोटीस कधी दिली होती? उत्तर देण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला होता का? या मुद्द्यावरून आक्षेप घेतले जात आहेत. याच चर्चेदरम्यान या चिमुकलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
आंबेडकर नगरमध्ये अतिक्रमणाविरोधात बुलडोझर कारवाई चालू असतानाच एक चिमुकली अचानक एका झोपडीत गेली आणि तिथून हातात पुस्तकांचा गठ्ठा असलेलं दप्तर घेऊन बाहेर पळत आल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओत पळणाऱ्या ८ वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे अनन्या यादव. आपल्या शाळेच्या दप्तरात असणारी हिंदी, इंग्रजी आणि गणिताची पुस्तकं घेऊन धावत असतानाचा अनन्याचा हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
? Demolition drive by local administration in Ambedkar Nagar district of Uttar Pradesh.
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) March 24, 2025
The little girl running with books in her hand should be provided the facilities she deserves as a basic human being. @ChiefSecyUP @myogiadityanath pic.twitter.com/U26D3doVga
सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल!
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारकडून राबलल्या जाणाऱ्या बुलडोझर कारवाईवर ताशेरे ओढताना सर्वोच्च न्यायालयाने या व्हिडीओचीही दखल घेतली आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचा उल्लेख करत या व्हिडीओमध्ये सगळ्यांनाच धक्का बसला आहे, असं नमूद केलं आहे.
“एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात बुलडोझरने काही छोट्या झोपड्या पाडल्या जात आहेत. एक लहानशी मुलगी पाडण्यात आलेल्या झोपड्यामधून हातात पुस्तकांचा गठ्ठा गेऊन धावत बाहेर येत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे”, असं न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी नमूद केलं.
नेमकं तिथे घडलं काय?
आपण पुस्तकं घेऊन असं का पळत सुटलो, हे या चिमुरडीनं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे. “मी त्या दिवशी शाळेतून परत आले आणि झोपडीत दप्तर ठेवलं. झोपडीच्याच बाजूला माझ्या आईने गुरांना बांधलं होतं. त्यांनी कारवाई सुरू केली आणि आमच्या बाजूच्या झोपडीत आग लागली. मी लगेच धावत गेले. मला वाटलं माझं शाळेचं दप्तर आणि पुस्तकांनाही आग लागली. माझ्या आईनं मला थांबवायचा प्रयत्न केला, पण मी थांबले नाही. पुस्तकं घेऊन मी परत आईजवळ गेले. पुस्तकं जळाली असती, तर शाळेतून नवीन मिळाली नसती”, असं या चिमुरडीनं सांगितलं आहे.
‘पिपली लाईव्ह’चा वास्तवातील अवतार?
काही वर्षांपूर्वी ‘पिपली लाईव्ह’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. एका छोट्याशा खेड्यातला शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्येचा निर्णय जाहीर करतो आणि त्या गावात प्रसारमाध्यमे, नेतेमंडळी यांची रीघ लागते. असाच काहीसा प्रकार अनन्या यादवच्या कुटुंबीयांना सध्या जाणवू लागला आहे.
“प्रशासनाकडून इथलं बांधकाम पाडण्याची कारवाई केली जात होती. पण या ठिकाणी माझं कुटुंब ५० वर्षांहून जास्त काळ वास्तव्य करत आहे. या प्रकरणाची सुनावणी तहसील न्यायालयात चालू असल्याचं मी आणि माझी मुलं प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजावून सांगत होतो. नेमकं त्याचवेळी एका झोपडीत आग लागली”, असं अनन्याचे आजोबा राम मिलन यादव यांनी सांगितलं. “आम्ही अतिशय सामान्य माणसं आहोत. पण जेव्हापासून तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तेव्हापासून खूप सारे लोक आम्हाला भेटायला येत आहेत. आमच्या जमिनीसाठी आम्ही लढा देत राहणार आहोत एवढंच आम्हाला माहिती आहे”, असंही राम मिलन यादव यांनी म्हटलं आहे.
“माझ्या मुलीचा व्हायरल व्हिडीओ पाहून खूप सारी नेतेमंडळी इथे येत आहेत. मला काहीही कळत नाहीये”, अशी प्रतिक्रिया अनन्याचे वडील अभिषेक यादव यांनी दिली. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शअर केला असून काँग्रेसनं या कुटुंबाला भेटण्यासाठी शिष्टमंडळ पाठवलं आहे.
दरम्यान, अनन्याची पुस्तकं ठेवली होती, त्या झोपडीला कारवाईदरम्यान कोणताही धक्का लागलेला नाही, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. तसेच, या कारवाईत कोणतंही निवासी बांधकाम पाडण्यात आलेलं नाही, असंही ते म्हणाले.