आजकाल पाळीव प्राण्यांचं क्रेझ आहे. प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे प्राणी पाळतो. वेगवेगळ्या ब्रीडच्या मांजरी आणि कुत्रे पाळले जातात. काही जणांचं तर त्यांच्या पाळीव प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की ते घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांना जपतात, त्यांची काळजी घेतात. प्राणीही माणसाला तेवढाच जीव लावतात हे ही खरं. बऱ्याचदा तर पाळीव प्राण्यांचा वाचवण्यासाठी त्यांचे मालक जीवावर देखील खेळून जातात. अशीच काहीशी घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून समोर आली आहे. याठिकाणी कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी एका मुलीला तिचा जीव गमवावा लागला. दुर्दैवाने कुत्र्याच्या पिलाचा देखील मृत्यू झाला आहे. बाल्कनीत अडकलेल्या एका पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या मुलीचा ९व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना दिल्लीजवळील गाझियाबादमधील गौर होम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये दुपारी घडली.

ज्योत्सना ही १२ वर्षीय मुलगी तिच्या पाळीव कुत्र्यासह गॅलरीमध्ये खेळत होती. यावेळी कुत्रा गॅलरीतील जाळीत अडकला. ज्योत्सना कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. याच दरम्यान तिचा तोल गेला आणि ती कुत्र्यासह ९व्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली पडली. यावेळी मुलीची आई घरातच होती. मुलीचा पडल्याच्या आवाज आल्यानंतर तिने बाहेर धाव घेतली. तिने बाल्कनीतून खाली पाहिले असता मुलगी जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिने तातडीने मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ही घटना घडली तेव्हा मुलीचे वडील घरी नव्हते. तसेच ज्या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात ज्योत्सना खाली पडली त्या पिलाचा देखील मृत्यू झाला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.