गेल्या काही दिवसांमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्यानं मानवावर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. आता दिल्लीत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे दीड वर्षाच्या चिमुकलीवर पिटबुल जातीच्या कुत्र्यानं हल्ला केला आहे. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दिल्लीच्या बुरारी भागात असलेल्या उत्तराखंड कॉलनीत २ जानेवारील दीड वर्षाच्या चिमुकलीवर पिटबुल कुत्र्यानं हल्ला केला. तेव्हा, सात ते आठ जणांनी पिटबुल कुत्र्याच्या तावडीतून चिमुरडीला वाचवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात चिमुकली गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्या पायचं हाड तीन ठिकाणी मोडलं असून १८ टाके पडले आहेत. चिमुरडीवर १७ दिवस रूग्णालयात उपचार सुरू होते.
याप्रकरणी चिमुरडीच्या कुटुंबीयांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात बुरारी पोलीस ठाण्याल गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, सीसीटीव्ही व्हिडीओ पाहूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. त्याउलट चिमुरडीच्या कुटुंबीयांनी तडजोड करण्यासाठी पोलिसांनी दबाब टाकला.
चिमुरडीच्या आजोबांनी सांगितलं, “पिटबुल कुत्र्याच्या मालकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. परिसरातील कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक बाहेर पडण्यास घाबरतात. एकाच कुटुंबातील तीन जणांना कुत्र्यांनी चावा घेतला होता.”