गुजरातच्या नवसारी येथे २६ वर्षीय प्रियकर २३ वर्षीय प्रेयसीला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला होता. हॉटेलमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर प्रेयसीचा रक्तस्राव सुरू झाला. घाबरलेल्या प्रियकराने प्रेयसीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याऐवजी ऑनलाईन उपचार शोधण्यात बराच वेळ घालविला. ज्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव होऊन प्रेयसीचा मृत्यू ओढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर प्रियकराच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण नेमके काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तस्राव सुरू झाल्यानंतर प्रियकराने रक्तस्राव थांबविण्यासाठी ऑनलाइन सर्च करून तात्पुरता उपाय राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रक्तस्राव थांबला नाही. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना हॉटेलवर बोलवून घेतले. त्यानंतर प्रेयसीला एका खासगी वाहनात बसवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हे वाचा >> Pakistani family in India: पाकिस्तानी कुटुंबानं ‘शर्मा’ नाव लावून बंगळुरूत केलं वास्तव्य; ‘असं’ फुटलं बिंग

पोलिसांनी सांगितले की, प्रियकराने वेळीच रुग्णालयात धाव घेण्याऐवजी मोबाइलवर ऑनलाइन उपाय शोधले होते. नवसारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल म्हणाले की, फॉरेन्सिक चाचणी अहवालानुसार अतिरिक्त रक्तस्राव झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रियकराने १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावण्याऐवजी आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले आणि तोपर्यंत तो हॉटेलवरच वाट पाहत राहिला. जर प्रेयसीला वेळीच उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचू शकले असते.

दरम्यान मुलीच्या वडिलांना याची कोणतीही माहिती नव्हती. रुग्णालयातून त्यांना फोन करून मुलीची तब्येत नाजूक असल्याचे सांगितले गेले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांना सर्व प्रकार समजला. मुलगी महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र सर्व प्रकार समोर आल्यानंतर तिचा खून झाल्याचा संशय घेत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करून मुलाला कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली.

हे ही वाचा >> Israeli Agent: इस्रायलच्या ‘मोसाद’चा गुप्तहेरच होता इराणच्या गुप्तवार्ता विभागाचा सदस्य; माजी राष्ट्राध्यक्षाचा धक्कायदायक खुलासा

दोघांची ओळख कशी झाली?

तपासानंतर लक्षात आले की, तीन वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. पण मधल्या दोन वर्षांत त्यांचा संपर्क नव्हता. सात महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर त्यांनी पुन्हा एकदा बोलणं सुरू केलं. अधूनमधून ते एकमेकांना भेटत होते. सात महिने एकमेकांना भेटल्यानंतर २३ सप्टेंबर रोजी यांनी हॉटेलमध्ये भेटण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा मुलीचा रस्तस्राव सुरू झाला त्यानंतरही प्रियकराने शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा परिस्थिती आणखी चिघळली, तेव्हाही त्याने एक ते दीड तास वाया घालवला, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी प्रियकराला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच आणखी तपास सुरू आहे.