पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यातच मुलींच्या लैंगिक शोषणाच्या सर्वाधिक घटना घडल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.
‘सेव्ह चिल्ड्रन’ या  एनजीओने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुजरात राज्यात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटनांचे प्रमाण ६३ टक्क्यांहून अधिक आहे. की जे इतर राज्यांहून सर्वाधिक आहे. गुजरातपाठोपाठ मध्यप्रदेश ५७ आणि पश्चिम बंगाल ५६ टक्के या राज्यांचा अनुक्रमे मुलींच्या लैंगिक शोषण घटनांमध्ये समावेश आहे.
‘द वर्ल्ड ऑफ इंडिया गर्ल्स’ संकल्पेनेखाली या एनजीओने घेतलेला सर्व्हे आणि ‘वूमन्स स्टडीज ऑफ टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालातून देशातील लैंगिक शोषणाच्या घटनांची आकडेवारी एका कार्यक्रमात केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री डॉ.नजमा हेपतुल्ला यांच्या समोर सादर करण्यात आली.  नजमा हेपतुल्ला यांनी यावर चिंता व्यक्त करत अशा घटनांना आळा घालणे आणि मुलींचे सक्षमीकरण करणे हाच मुख्य उद्देश राहील, असे सांगितले. तसेच देशात सध्या मुलींसाठी अस्तित्वात असलेल्या योजनांचे वास्तव देखील यातून नजरेस पडते. मुलींना जन्मापासून सामोरे जावे लागणाऱया अडचणी आणि संघर्षाची जाणीव या अहवालातून येते, असेही त्या पुढे म्हणाल्या. 

Story img Loader