पाकिस्तानचे झेंडेही फडकले; पोलिसांचा लाठीमार
काश्मीर खोऱ्यात प्रथमच झालेल्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत काही गटांनी हुल्लडबाजीस सुरुवात केल्याने मोठा गोंधळ उडाला. या वेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या मुली; तसेच महिला धावपटूंचा विनयभंग करण्यात आला. बेशिस्त तरुणांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही तरुणांनी पाकिस्तानचा झेंडेही हवेत फडकावले. विनयभंगाचे प्रकार घडल्याने अशांतता निर्माण झाली, असे सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाने म्हटले आहे. युवकांनी घोषणाबाजी करून दगडफेक केली त्यावेळी लाठीमार करण्यात आला व नंतर अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली व आता परिस्थिती नियंत्रणात आहे असे पोलिसांनी सांगितले. यात कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
दाल सरोवर संवर्धनासाठी राज्यात जागृती मोहिमेचा भाग म्हणून रविवारी २१ किलोमीटरची अर्धमॅरेथॉन झाली. हजरतबाल येथील काश्मीर विद्यापीठातून या मॅरेथॉनला सकाळी सुरुवात झाली. मॅरेथॉन दाल सरोवरमधून जाणार होती. यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हेही सहभागी होणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी माघार घेतली.
काही लोकांनी महिला धावपटूंशी गैरवर्तन केले, छेडछाड व विनयभंगाचे प्रकार झाले असे पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या युवक आघाडीचे प्रमुख वाहिद पॅरा यांनी सांगितले. काही युवकांनी पाकिस्तानी झेंडे फडकावित छेडछाड व विनयभंग केला. हा अराजकीय कार्यक्रम होता. नोंदणी ऐच्छिक होती, राजकीय नेत्यांना निमंत्रण नव्हते. ओमर अब्दुल्ला यांनी स्वेच्छेने नावनोंदणी केली होती. १५ आंतरराष्ट्रीय धावपटूंनी सहभाग निश्चित केला होता. एकूण १५ हजार लोकांनी नोंदणी या मेरॅथॉनसाठी केली होती.
मॅरेथॉनमध्येही काही लोक राजकारण आले आणीत आहेत, याचे खूप वाईट वाटते.
-ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री