गीता गोपीनाथ हे नाव भारतीयांसाठी नवीन नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्री म्हणून ओळख असलेल्या गीता गोपीनाथ यांच्याविषयी प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना आहे. मात्र, पुन्हा आपल्याला गर्व वाटावा, असे ट्वीट गीता गोपीनाथ यांनी केली आहे. त्यांचे अधिकृत पोर्ट्रेट IMFच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या पोर्ट्रेटच्या बाजूला लावण्यात आले आहे. त्याचे फोटो त्यांनी ट्वीटद्वारे शेयर केले आहे.
गीता गोपीनाथ यांनी दोन फोटो ट्वीट करत त्याला ‘ब्रेकिंग द ट्रेंड’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच माझ पोर्ट्रेट सुद्धा IMFच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या पोर्ट्रेटच्या बाजूला लावण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. IMFच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या पोर्ट्रेटच्या रांगेत त्या एकमेव महिला आहेत. त्यामुळेच त्यांनी मी ट्रेंड ब्रेक करत आहे, असं कॅप्शन दिलं आहे.
५० वर्षीय गीता गोपीनाथ या २०१९ ते २०२२ दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्री म्हणून काम बघितले होते. त्या सद्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत. जानेवारी २०२२ मध्ये त्या या पदावर रुजू झाल्या आहेत.
कोलकाता येथे जन्मलेल्या गोपीनाथ यांनी दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून बीए आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमए केले. तसेच त्यांनी प्रतिष्ठित प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली आहे.