सुमारे सहा महिन्यांपूर्वी Github नावाच्या एका मोबाईल अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो पोस्ट करून त्याबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यावरून बराच वाद झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई देखील केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. १ जानेवारी रोजी काही मुस्लीम महिलांचे सोशल मीडियावरील फोटो या अॅपवर अपलोड करून त्यावर अश्लील भाषेत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. महिलांचा लिलाव करण्याची भाषा देखील या मजकुरामध्ये वापरण्यात आली होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार दाखल केली.
मुस्लीम महिला पत्रकाराच्या ट्वीटमुळे प्रकार उघड!
यासंदर्भात इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, एका मुस्लीम महिला पत्रकाराने ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट लिहिली होती. या महिलेचा देखील फोटो या अॅपवर अपलोड करण्यात आला होता. ‘Bulli Bai’ नावाच्या युजर ग्रुपवरून हे फोटो अपलोड करण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. सोशल मीडियावरून मुस्लीम महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय घेणे आणि ते Github या अॅपवर अपलोड करणे हा प्रकार सर्रास घडत असल्याचं समोर आल्यानंतर त्यावरून सर्वच स्तरातून संताप व्यक्त होताना दिसत आहे.
प्रियांका चतुर्वेदींची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार
दरम्यान, याबाबत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच, तक्रार करून देखील अश्विनी वैष्णव त्याची दखल घेत नसल्याचं देखील त्यांनी ट्वीट करून म्हटलं होतं.
दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांच्या ट्वीटवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करून यासंदर्भात संबंधित अॅपनं कारवाई केल्याची माहिती दिली आहे. “गिटहबनं माहिती दिली आहे की त्यांनी संबंधित युजरला ब्लॉक केलं आहे. सीईआरटी आणि पोलीस प्रशासन यासंदर्भातील पुढील कारवाई करत आहेत”, असं ट्वीट वैष्णव यांनी केलं.
फक्त ब्लॉक नाही, कठोर कारवाई हवी!
या ट्वीटनंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी गिटहबकडून फक्त संबंधित युजरवर कारवाई होणंच पुरेसं नसून त्याच्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे.
काही महिन्यांपूर्वी सुली डील्स या नावाने गिटहबवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आल्याचं उघड झालं होतं. त्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर हा मजकूर हटवण्यात आला होता. सुली हा शब्द मुस्लीम महिलांचा अपमान करण्यासाठी वापरला जातो. त्यावरून मोठा वाद झाला होता. अशा प्रकारे महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न कोण करतंय? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.