इजिप्तमधील कट्टरपंथीय मुस्लिमांनी कोणत्याही मार्गाने तेथील सत्ता हस्तगत करावी, असे फर्मान अल-कायदाचा म्होरक्या आयमान अल जवाहिरी याने सोडले आहे. जवाहिरीची १६ मिनिटांची एक ऑडिओ टेप नुकतीच प्रसारित करण्यात आली, त्यात त्याने इजिप्त आणि टय़ुनिशियामधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही देशांच्या सत्ताधाऱ्यांनी नको तितकी मवाळ भूमिका घेतल्यानेच त्यांना सत्ताच्युत व्हावे लागले, असे त्याने म्हटले आहे.  
या टेपमध्ये तो पुढे म्हणतो की, इजिप्तमध्ये कट्टरपंथीय मुस्लिमांना सत्ता राखता आली नाही, मोर्सी यांचे सरकार बरखास्त करण्यात ज्या लष्करी शक्तीचा हात होता, त्याच मंडळींनी आता इस्लामविरोधातही युद्ध छेडले आहे. या शक्तींना इस्रायल आणि अमेरिकेचा पाठिंबाही आहे. मोर्सी यांनी ताठर भूमिका घेतली असती तर ही परिस्थिती ओढवली नसती. इजिप्तच्या नव्या सरकारची घडी अद्याप नीट बसलेली नाही, त्यामुळे याचा लाभ घेत तेथील कट्टरपंथीय मुस्लिमांनी कोणत्याही मार्गाने सत्ता हस्तगत करणे आवश्यक आहे.   
इजिप्तमध्ये गेल्या वर्षी प्रथमच लोकनियुक्त सरकार सत्तेत आले होते. होस्नी मुबारक यांची दीर्घकालीन जुलमी राजवट जाऊन मोहम्मद मोर्सी यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. कट्टरपंथीय असणाऱ्या मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेचा मोर्सी यांना पाठिंबा होता, मात्र काही चुकीच्या निर्णयांमुळे मोर्सी यांनाही जनक्षोभाला सामोरे जावे लागले व अखेर सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. मोर्सी यांनी सत्ता गमावल्याने मुस्लीम ब्रदरहूडची पीछेहाट झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give power of egypt says extremist
Show comments