भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांना साबिर अली यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा अन्यथा माफी मागण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. सोमवारी ही मुदत संपुष्टात आल्यामुळे भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांच्या घराबाहेर साबिर अली यांच्या पत्नी निदर्शनाला बसल्या आहेत. नक्वी साबिर अली यांची माफी मागत नाहीत, तोवर आपली निदर्शने सुरूच राहील, असे साबिर अली यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना सांगितले. यापूर्वी रविवारी २४ तासांच्या आत मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपली माफी न मागितल्यास आपण त्यांच्या घराबाहेर धरणे आंदोलनाला बसणार असल्याची माहिती साबिर अली यांनी दिली होती. तसेच मुख्तार अब्बास नक्वी यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत अन्यथा आपली माफी मागावी, असा पवित्रा भाजपमधील औट घटकेचे सदस्य ठरलेल्या साबिर अली यांनी घेतला होता.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून साबिर अली यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मात्र, भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी आणि संघ परिवाराच्या कडव्या विरोधानंतर पक्षप्रवेशाच्या दुस-याच दिवशी साबिर अलींची भाजपमधून गच्छंती करण्यात आली होती. त्यानंतर साबिर अली यांनी पत्रकारपरिषद घेऊन नक्वी यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली अन्यथा आपण त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा साबिर अली यांनी दिला. मुख्तार अब्बास नक्वी यांनी साबिर अलींवर दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे आरोप केले होते. मात्र, नक्वींनी केलेले आरोप सिद्ध झाल्यास आपण फाशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेसुद्धा साबिर अली यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा