पीटीआय, नवी दिल्ली : भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांच्या लोकसभेमधील वर्तनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे निषेध करावा आणि त्यांना योग्य शिक्षा होईल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी बसप खासदार दानिश अली यांनी केली आहे. अली यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान २१ सप्टेंबरला रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांना उद्देशून असभ्य भाषा वापरल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी अद्याप त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. बिधुरी यांच्या भाषणानंतर आपल्याला वाढत्या प्रमाणात धमक्या मिळत असून आपल्या सुरक्षेमध्ये वाढ केली जावी, अशी मागणीही अली यांनी या पत्राद्वारे केली आहे.

रमेश बिधुरी यांनी आपल्यावर चढवलेला शाब्दिक हल्ला हा केवळ वैयक्तिक नसून लोकशाहीवर केलेला हल्ला आहे असे अली यांनी या पत्रात नमूद केले आहे. सभागृहाचे नेते या नात्याने आपण या प्रसंगाची दखल घ्यावी, अशी विनंती अली यांनी पंतप्रधानांना केली आहे. बिधुरी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधानांचा संदर्भ देताना असभ्य भाषेचा वापर केला असा दावा अली यांनी केला आहे. त्याविरोधात मी भूमिका घेतली त्याला सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही सदस्याने विरोध केला नाही असे अली यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांच्या संदर्भात अवतरणात असली तरी अशा भाषेचा मी विरोध केला. त्यानंतर त्यांनाही आपली चूक कळली असावी आणि ते संतापले. त्यांनी सभागृहाचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी माझ्याविषयी अतिशय अपमानजनक शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली. -दानिश अली, खासदार, बसप

Story img Loader