जाहिरात कंपन्या वस्तू किंवा सेवांची जाहिरात करण्यासाठी काय नवीन फंडा काढतील सांगता येत नाही, पुण्यातील ड्रीमर्स मीडिया अँड अॅडव्हर्टायझिंग या कंपनीने मोटारमालकांना अशीच एक आकर्षक ऑफर दिली आहे, त्यानुसार या मोटारमालकांनी त्यांच्या मोटारीचा वापर फिरत्या जाहिरात फलकासाठी करू दिला तर त्यांच्या मोटारीचे कर्जाचे हप्ते (इएमआय) ही कंपनी फेडेल.
कंपनीने असे म्हटले आहे, की जर अशाप्रकारे मोटारीचा वापर जाहिरात फलकासाठी करू दिला तर पहिल्या तीन वर्षांत आम्ही हप्ते भरू व उर्वरित दोन वर्षांत मालकाने कर्जाची परतफेड करावी, तसेच कार विकत घेताना २५ टक्के रक्कम रोख द्यावी.
ड्रीमर्स मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीस महंमद यांनी सांगितले, की या संकल्पनेमुळे मोठय़ा प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. संज्ञापनाचा हा एक नवीन मार्ग आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाचे मोटार घेण्याचे स्वप्नही साकार होईल. या योजनेत सहा लाख इतकी ऑनरोड किंमत असलेल्या मोटारींचेच इएमआय हप्ते भरले जातील. ही मोटार महिन्याला महानगरातून १५०० कि.मी. फिरली पाहिजे व त्यापेक्षा लहान शहर असेल तर तिथे हजार ते बाराशे कि.मी. फिरली पाहिजे, अशा अटी आहेत. यात जाहिरात कंपनी वाहनाची ४० ते ६० टक्के जागा त्यांच्या ग्राहकांच्या उत्पादन व सेवांची जाहिरात करणाऱ्या व्हिनाइल स्टिकर्सने भरून टाकेल. ड्रीमर्स मीडिया ही जाहिरात कंपनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ही योजना सुरू करीत असून, या आर्थिक वर्षांत पंधरा हजार व पुढील आर्थिक वर्षांत १ लाख मोटारी अशा प्रकारे जाहिरात फलकांसाठी वापरण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा