भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय आरोपप्रत्यारोप नेहमी होत असतात. भाजपाकडून काँग्रेसवर अनेकदा घराणेशाहीचा आरोप केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अनेकदा काँग्रेस हा परिवारवादी पक्ष असल्याचे म्हणत आपल्या भाषणांतून काँग्रेसला लक्ष्य केलेले आहे. २१ मार्चला काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जावयासह कर्नाटकातील काँग्रेसच्या पाच मंत्र्यांच्या मुलांची नावे आहेत. यावरुनच काँग्रेसला पुन्हा घराणेशाहीच्या टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर भाष्य केले आहे.
‘हे घराणेशाहीचे राजकारण नाही’
सिद्धरामय्या यांनी रविवारी घराणेशाहीच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की मंत्र्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना निवडणुकीचे तिकीट देणे हे घराणेशाहीचे राजकारण नाही. मतदासंघांतील मतदारांचा कल काय याचा विचार करून कार्यकर्ते आणि नेते यांच्या शिफारशी मान्य कराव्या लागतात. त्यानंतर उमेदवारी निश्चित करण्यात येते, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना सांगितले.
कोणाला कुठून दिली उमेदवारी?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामनी यांना कलबुर्गी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या कन्या प्रियंका यांना चिक्कोळी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, तर परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांची मुलगी सौम्या रेड्डी बेंगळुरू दक्षिणमधून भाजपाचे विद्यमान खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध लढणार आहे. वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांच्या कन्या संयुक्ता पाटील बागलकोटमधून, तर महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर बेळगाव आणि वनमंत्री ईश्वर खांद्रे यांचा मुलगा सागर खांद्रे बीदरमधून लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. राज्यसभेचे माजी उपसभापती के. रहमान खान यांचा मुलगा मन्सूर अली खान यांना बंगळुरू सेंट्रल तसेच एसएस मल्लिकार्जुन यांच्या पत्नी प्रभा मल्लिकार्जुन दावणगिरी येथून रिंगणात आहेत. तर उरलेल्या ४ मतदासंघांची यादी एक-दोन दिवसांत जाहीर होईल असे यावेळी सिद्धरामय्या यांनी सांगितलं.
चामराजनगरमधील उमेदवारीवर काय म्हणाले?
चामराजनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर तोडगा निघत नसल्याच्या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले की, “चामराजनगरमध्ये उमेदवार निवडीचे काम सुरू असून कोणतीही अडचण नाही. आम्हाला एकदाच सर्व उमेदवार याद्या जाहीर करायच्या नाहीत. राहिलेल्या याद्या जाहीर झाल्यावर सगळं चित्र स्पष्ट होईल.”
किती जागा निवडून येतील?
“भाजपासारखे आम्ही सर्व २८ जागांवर निवडून येऊ असं खोटं बोलणार नाही, पण कर्नाटकात आम्ही किमान २० जागांवर विजय मिळवू असा विश्वास आम्हाला आहे. “भाजपा आणि जेडीएस यांची युती काँग्रेससाठी अडचणीची ठरेल का? या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले की त्यांची युती काँग्रेससाठी अनुकूल वातावरण तयार करत आहे. यावर सविस्तर बोलण्यास मात्र त्यांनी टाळले.
“आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो”
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की आम्ही राबवलेल्या पाच जनकल्याणकारी योजना लोकांना आवडलेल्या आहेत. त्यामुळे मतदारांना आम्ही आकर्षित केले आहे. त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत नक्कीच होईल. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी यावर्षी ३६ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. पुढील आर्थिक वर्षात ५२ हजार ९०० कोटी रुपये जनकल्याण योजनांसाठी राखून ठेवू. आम्ही भाजपासारखे खोटे बोलत नाही, आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो. ते पुढे म्हणाले आमच्यावर लोकांचा विश्वास आहे. कारण आम्ही दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करतो. भाजपासारखे खोटे बोलत नाही. भाजपा निवडणुकीत दिलेले कोणतेही वचन पाळत नाही. तसेच त्यांची अंमलजावणीही करत नाही, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.
“२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ६०० आश्वासने दिली, मात्र त्यातील १० टक्केही पूर्ण केली नाही. पंतप्रधान मोदींनी १५ लाख दिले का? २ कोटी रोजगार दिले का? शेतकऱ्यांना हमीभाव तसेच त्यांचे उत्पन्न दुप्पट केले का? अच्छे दिन आले का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी “पुन्हा जनता भाजपला मतदान करणार नाही”, असं सांगितल. दरम्यान, कर्नाटकमध्ये एकूण २८ जागांसाठी २६ एप्रिल आणि ७ मे या दोन टप्प्यांत लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.