नेपाळमधील गेल्या ८० वर्षांतील सगळ्यात मोठय़ा भूकंपातून वाचलेल्या लोकांना शोधण्याची आणि गरजूंना मदत पुरवण्याची धडपड भारतासह जगभरातून मदतीसाठी आलेले स्वयंसेवक करत आहेत. या भूकंपातील बळींची संख्या ६२००वर, तर जखमींची संख्या १४ हजारांवर गेली आहे. नेपाळमधील अडीच लाखांहून अधिक इमारतींचे भूकंपामुळे नुकसान झाले आहे.
नेपाळमध्ये आता काळाबाजार आणि साठेबाजी
हिमालयाच्या कुशीतील नेपाळला भूकंपाचा धक्का बसला, तेव्हापासून जगभरातून मानवतावादी दृष्टिकोनातून मदत येणे सुरू झाले. एरवी विदेशी पर्यटकांनी गजबजलेले काठमांडू हे राजधानीचे शहर सध्या अनाहूत मदतकर्त्यांनी भरले आहे. या दुर्घटनेला सहा दिवस उलटून गेल्यानंतर, अद्याप ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती असलेल्या जिवंत व्यक्तींना शोधण्यासाठी मलब्याचे ढिगारे हुडकून काढत आहेत.
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील परिस्थिती सामान्य व्हावी याकरता भारत, चीन आणि पाकिस्तान ही शेजारी राष्ट्रे मदत करत असून अमेरिका व पोलंड यांनीही पथके पाठवली आहेत. पाच महिन्यांचे एक मूल आणि १५ वर्षांचा एक किशोर आश्चर्यकारकरीत्या बचावल्यामुळे या अंधारलेल्या स्थितीतही आशेचे किरण दिसत आहेत. अनेक जण आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र परिश्रम करत आहेत.
जिनेव्हा येथील ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ दि रेड क्रॉस’ (आयसीआरसी) आणि ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ यांसारख्या संस्थांचे कार्यकर्तेदेखील गोंधळ, दु:ख आणि भीतीच्या वातावरणात सहृदयतेची फुंकर घालत आहेत. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या कार्यकर्त्यांनी अस्थायी रुग्णालये उभारली असून आवश्यक ती वैद्यकीय मदतही येऊन पोहोचली आहे. नेपाळमधील भूकंपग्रस्त कुटुंबे आणि समुदाय यांच्या वाढत्या गरजा पुऱ्या करण्यासाठी आयसीआरसी नेपाळ रेडक्रॉस सोसायटीला मदत करत आहे. बेपत्ता झालेल्या कुटुंबांचा शोध लावण्यासाठी त्यांनी संकेतस्थळही सुरू केले आहे.
या भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या १५ हजार इतकी मोठी असू शकते, अशी भीती नेपाळच्या लष्करप्रमुखांनी काल व्यक्त केली होती. भारतात दिल्लीपासून बंगलोपर्यंत अनेक ठिकाणी स्वयंसेवकांनी भूकंपग्रस्तांसाठी मदत गोळा करणे सुरू केले आहे.
दरम्यान, ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळमधील सुमारे १.४ लाख इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. सुमारे १ लाख ३८ हजार घरांचे संपूर्ण, तर १ लाख २२ हजार घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनुसार, १०,३९४ सरकारी इमारती भुईसपाट झाल्या असून १३ हजारांहून अधिक अंशत: ध्वस्त झाल्या आहेत. भूकंपात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये, तर जखमींच्या उपचारासाठी २५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे.
विनाशकारी भूकंपाला आठवडाही व्हायचा असताना नेपाळला शुक्रवारी सकाळी ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. काही तासांनी ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद काठमांडूपासून ३०० किलोमीटरवरील दोलाखा जिल्ह्य़ात करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा