Donald Trump Plan Behind Reciprocal Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ एप्रिलला जगभरातल्या देशांवर Reciprocal Tariff अर्थात समन्यायी व्यापार कर लागू केला. यात काही देशांवर सरसकट १० टक्के तर चीनवर थेट २४५ टक्के कर आकारले आहेत. इतरही काही देशांवर हे प्रमाण कमी-जास्त असं ठेवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प यांनी तडकाफडकी घेतलेल्या अनेक निर्णयांसह या निर्णयावरही टीका होत असताना प्रसिद्ध लेखक व ग्लोबल इन्व्हेस्टर रुचिर शर्मा यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांच्या धोरणाचं सविस्तर विश्लेषण केलं आहे.
काय म्हणाले रुचिर शर्मा?
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला अतिरिक्त आयात कर लागू करण्याचा निर्णय आणि त्याचा जगभरातील देशांवरचा परिणाम याचा भारताला अप्रत्यक्षपणे फायदाच होईल, अशी भूमिका रुचिर शर्मा यांनी मांडली आहे. “अमेरिकेतून गुंतवणूक बाहेर पडताना दिसत आहे. पण याचा भारताला फायदा होतोय. फक्त शेअर मार्केटमध्येच नाही, परकीय गुंतवणूक वाढण्यामध्येही. कदाचित हे सगळं भारतासाठी जितकं वाईट मानलं जात होतं, तेवढं वाईट नसेल”, असं ते म्हणाले.
“महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय बाजारपेठेत सध्या अमेरिकेतील घडामोडींच्या विरुद्ध कल पाहायला मिळत आहे. याआधी वॉल स्ट्रीट शेअर बाजारामध्ये दिसणाऱ्या कलांच्या अनुषंगानेच भारतीय बाजारपेठेचं वर्तन पाहायला मिळत होतं”, असंही रुचिर शर्मांनी नमूद केलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमागचं धोरण!
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर खुद्द अमेरिकेतूनही नाराजी व्यक्त झाली. अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. त्यामुळे ट्रम्प यांचा हा निर्णय आततायीपणाचा असल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. पण या सगळ्यामागे ट्रम्प यांचं स्पष्ट धोरण असल्याचं विश्लेषण रुचिर शर्मा यांनी केलं आहे. त्यासाठी काही उदाहरणंदेखील त्यांनी दिली आहेत.
“डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक धोरणं प्रचंड गोंधळाची वाटत आहेत. पण त्यात एक सुनियोजित पॅटर्न आपल्याला दिसून येतो. त्यांच्या या वेडेपणामागे एक निश्चित अशी पद्धत आहे. ट्रम्प यांनी हे एकदम बरोबर ओळखलंय की अमेरिकन नागरिकांचं तिथल्या अर्थव्यवस्थेबाबतचं मत नकारात्मक झालं असून त्यांच्याविरोधात ही अर्थव्यवस्था असल्याचं त्यांना वाटतंय. हे टॅरिफ कदाचित अंदाज घेण्यासाठी म्हणून घेतलेला निर्णयही असू शकतात. पण त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांना शांत करण्यासाठीचा गोंधळ इतर देशांमध्ये निर्माण होऊ शकतो”, असं रुचिर शर्मा म्हणाले आहेत.
माघारीनंतरही ट्रम्प यांचा विजयच – रुचिर शर्मा
“डोनाल्ड ट्रम्प यांची ही पद्धत आहे. ते असा अचानक एखादा बॉम्ब टाकतात. त्यानंतर काय घडतंय ते बघतात आणि नंतर त्यात पुन्हा फेरबदल करतात. ट्रम्प नेहमीच तडजोडीच्या चर्चांमध्ये काहीतरी मोठी मागणी ठेवतात. उदाहरणार्थ ३० टक्के टॅरिफ आकारणी. मग ती कमी करून १० टक्क्यांपर्यंत आणतात. पण टॅरिफ कमी केलं तरी ते १० टक्के असतंच. त्यामुळे माघारीनंतरही त्यांचा विजयच झालेला असतो”, असं रुचिर शर्मांनी नमूद केलं.
“ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात हे टॅरिफ १ टक्क्यापासून अवघे २.५ टक्के झाले होते. पण यावेळी किमान टॅरिफ दरच १० टक्के आहेत. अर्थात, १० टक्के हेदेखील पुरेसं प्रमाण आहे. पण ते भीषण ठरत नाही”, अशा शब्दांत रुचिर शर्मांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं विश्लेषण केलं आहे.
“खरा धोका चीनशी तणाव हा आहे”
दरम्यान, चीनशी अमेरिकेचे ताणले गेलेले संबंध हा खरा धोका असल्याचं शर्मा यांचं मत आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे टॅरिफ दर जाहीर केले तेव्हा शेअर बाजार गडगडले नाहीत. पण चीननं जेव्हा त्यावर प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली, तेव्हा जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये कोलाहल झाला. चीन म्हटलं की आम्ही हे दर स्वीकारणार नाही, विरोध करू, तेव्हा गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या”, असं रुचिर शर्मांनी नमूद केलं.
आत्ता नुकसान, पण भविष्यात फायदा?
दरम्यान, ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा भविष्यात फायदा होईल याबाबत रुचिर शर्मा आशावादी आहेत. “डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला पुन्हा महान बनवतील की नाही, हा चर्चेचा मुद्दा आहे. पण ते जगाला पुन्हा एकदा महान बनवू शकतात. कारण त्यांच्या या धोरणांमुळे जगभरातल्या देशांच्या प्रमुखांना कृती करावी लागली आहे. उदाहरणार्थ जर्मनीनं ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर निर्माण झालेल्या जगभरातील आर्थिक संभ्रमावस्थेचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत आर्थिक सुधारणा हाती घेतल्या आहेत”, असं रुचिर शर्मा म्हणाले.