मुंबईवरील २६\११ हल्ल्याचा सूत्रधार आणि कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानमधील आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याचे कळते. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यावेळी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे हाफिज सईदने सांगितले. लाहोर उच्च न्यायालयाने हाफिजची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर हाफिजने याबद्दलचे संकेत दिले होते. ही अटकळ आता खरी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबद्दल हाफिजने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. हाफिज खरोखरच निवडणुकीला उभा राहिल्यास मोदी सरकार कशाप्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जानेवारीपासून हाफिज सईद लाहोरमधील घरीच स्थानबद्ध होता. गेल्या महिन्यात लाहोर हायकोर्टाच्या न्यायिक परीक्षण मंडळाने सईदच्या स्थानबद्धतेला महिनाभराची मुदतवाढ दिली होती. मात्र, यावेळी सरकारकडे स्थानबद्धता वाढवण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचे सांगत मंडळाने सईदला मुक्त करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयावर भारताने टीका केली होती. ‘मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण व्हायला दोन दिवस असताना त्यांनी (पाकिस्तानने) हाफिज सईदची सुटका केली. त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशाला आंतरराष्ट्रीय समुदायात कोणतेही स्थान नाही’, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी पाकिस्तानला फटकारले होते.
हाफिज सईद याची कुख्यात दहशतवादी संघटना जमात-उद-दवाने यापूर्वीच सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी ‘मिलि मुस्लिम लिग’ या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. हाफिज सईद याला लाहोरमध्ये ताब्यात घेतल्यानंतर ‘मिलि मुस्लिम लिग’ची स्थापना करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. याठिकाणी नवाज शरीफांची पत्नी कुलसूम यांच्याविरोधात जमात-उद-दवा पुरस्कृत उमेदवार शेख याकुब यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीत याकुब शेख यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेल्या मतांची संख्या लक्षणीय होती.