वारंवार कमी होणाऱ्या पाण्यामुळे अतिसाराचीही वाढती समस्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य अमेरिकेसह भारत आणि श्रीलंकेतही २० हजारांहून अधिक लोक मूत्रपिंड (किडनीच्या) विकाराने मृत्युमुखी पडले असून या अत्यंत जुनाट आणि तीव्र अशा अतिसारास (डिहायड्रेशन) जागतिक हवामानविषयक बदल कारणीभूत असल्याचे एका अभ्यासाअंती आढळले आहे. जागतिक तापमानवाढीशी याचा संबंध आहे का, याचा अभ्यास सध्या करण्यात येत आहे. ‘‘जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण झालेला हा अशा प्रकारचा पहिला विकार असू शकेल,’’ असे अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो स्कूल ऑफ मेडिसिन’चे प्राध्यापक रिचर्ड जे. जॉन्सन यांनी सांगितले.
या जुनाट आजारामुळे अनेक पुरुष कामगार मरण पावले असून वाढत्या मृत्युदरामुळे निकारागुवातील काही जिल्हे तर केवळ ‘विधवांची भूमी’ म्हणूनच ओळखले जात असल्याचे जॉन्सन पुढे म्हणाले. मध्य अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील उष्ण व सखल भागात काम करणाऱ्या ऊस उत्पादक पुरुष कामगारांमध्ये या रोगाचा प्रामुख्याने मूत्रिपड विकाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. तीव्र स्वरूपाची कीटकनाशके, धातू, विषारी रसायने तसेच अन्य घटकांमुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगितले जात असले तरी शरीरातून वारंवार कमी होणाऱ्या पाण्यामुळेही अतिसाराची ही समस्या तीव्र झाली असावी, असे जॉन्सन यांना वाटते.
निकारागुवा आणि अल् साल्वादोर येथे काम करणाऱ्या ऊस कामगारांच्या आरोग्याची तपासणी संशोधकांनी केली असता, उष्णतेविषयक अमेरिकेने घालून दिलेल्या मापदंडकांपेक्षा अधिक उष्ण वातावरणात हे कामगार काम करीत असल्याचे या संशोधकांना आढळून आले. या कामगारांपैकी काही जण तर तासाला एक ते दोन लिटर पाणी पिऊनही त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्याची समस्या दररोजच भेडसावत असल्याचे दिसले.
याच समस्येमुळे कामगारांच्या रक्तात ‘हायपरयुरेसेमिया’ किंवा युरिक अ‍ॅसिडची पातळी मोठय़ा प्रमाणावर वाढण्यात आल्याकडेही संबंधितांनी लक्ष वेधले आहे. अल् साल्वादोर येथील ऊस कामगारांच्या रक्तातील युरिक अ‍ॅसिडची पातळी सकाळी तपासण्यात आली असता ती प्रति डेसीलिटरमागे ६.६ मिलिग्रॅम आढळली, तर हीच पातळी दुपारच्या वेळी ७.२ मिलिग्रॅम दिसून आली. अतिसाराच्या परिणामी किडनी वेगाने कार्यरत होऊन त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची निर्मिती होते आणि त्याचा परिणाम मूत्रपिंड निकामी होण्यात होतो, असेही आढळून आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global warming relations with kidney disorder