जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेचं कलम ३७० केंद्र सरकारने २०१९मध्ये हटवलं. यावरून देशभरात वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं. आता कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला २ वर्ष पूर्ण होत असताना त्याच नावाने गुजरातमध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गांधीनगर या लोकसभा मतदारसंघात ही क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे. तरुण मतदारांना अधिकाधिक प्रमाणात भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी कलम ३७० च्या नावाने ही टुर्नामेंट आयोजित केल्याचं भाजपाचे गांधीनगर लोकसभा मतदारसंघ इनचार्ज हर्षद पटेल यांनी सांगितलं आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ही टुर्नामेंट खेळवली जाणार आहे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेट आणि कबड्डी!

GLPL 370 अर्थात गांधीनगर लोकसभा प्रिमियर लीग ३७० असं या टुर्नामेंटचं नाव असणार आहे. “मतदार याद्यांमध्ये असलेल्या तरुण मतदारांना भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येत आहे. यासाठी क्रिकेट आणि कबड्डीची निवड करण्यता आली आहे. मतदारसंघातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये किमान एक क्रिकेट आणि एक कबड्डीची टीम असावी, हे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे”, अशी माहिती हर्षद पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

अमित शाह यांनीच मांडली कल्पना!

हर्षद पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट टुर्नामेंटच्या आयोजनाची ही कल्पना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच मांडली आहे. “गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदा या कल्पनेवर पक्षातील काही मोजक्या मंडळींशी चर्चा केली. त्यानंतर सुमारे २०० ते २५० कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यामध्ये सगळ्यांना योग्य त्या जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं.”

कशी असेल टुर्नामेंट?

पाच वर्षांपूर्वी गांधीनगरमध्ये कर्नावती प्रिमियर लीगचं आयोजन करणारे गुजरातचे राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांना पूर्ण टुर्नामेंटचं आयोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण गांधीनगर मतदारसंघासाठी एक कबड्डी टुर्नामेंट आणि यातील सात विभागांसाठी प्रत्येकी एक अशा सात क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येणार आहे. सध्या ही टुर्नामेंट फक्त पुरुषांसाठी खुली असणार आहे.

Story img Loader