Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान २० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अनेक पर्यटक दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. अनेक पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील एक कुटुंब सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते. यावेळी मंजूनाथ यांच्यावर अतिरेक्यांनी गोळीबार केला. तर त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांचा मुलगा हल्ल्यातून बचावले आहेत. यावेळी पल्लवी यांनी या हल्ल्याची दाहकता कथन केली. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पल्लवी म्हणाल्या, आम्ही तिघे काश्मीरमध्ये सुट्ट्यांनिमित्त आलो होतो. दुपारच्या दरम्यान अचानक हल्ला सुरू झाला. माझ्या डोळ्यादेखत माझ्या पतीला गोळ्या झाडल्या. मला अजूनही विश्वास बसत नाही की, माझे पती हयात नाहीत. अगदी काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.हल्ला झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ आमच्या मदतीसाठी धाव घेतली. तेथील तीन लोकांनी माझा जीव वाचवला, असेही पल्लवी म्हणाल्या.
मोदींना जाऊन सांगा
पल्लवी पुढे म्हणाल्या, “अतिरेकी फक्त हिंदूंना लक्ष्य करत होते. तीन ते चार अतिरेकी आमच्या दिशेने आले होते. माझ्या पतीला मारल्यानंतर मी त्यांना म्हणाले की, मलाही मारून टाका. त्यावर त्यांच्यातील एक जण म्हणाला की, आम्ही तुला मारणार नाही. तू जाऊन हे सर्व मोदींना सांग.”
पती मंजूनाथ यांचे पार्थिव शिवमोगा जिल्ह्यात नेण्यासाठी मदत करा, असे आर्जव पल्लवी यांनी स्थानिक यंत्रणेला केले आहे. मृतदेह पहलगाम येथून आणणे शक्य नव्हते. तिथून तो एअरलिफ्ट करावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक्स वर पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध नोंदविला आहे. कन्नडींगाचा या हल्ल्यात मृत्यू झाला, ही आमच्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने राज्य सरकारची बैठक बोलावली आहे. मुख्य सचिव आणि पोलीस अधिकारी दिल्लीमधील निवासी पोलीस आयुक्तांच्या संपर्कात आहेत. ज्या लोकांना या हल्ल्याचा फटका बसला, त्यांच्यापाठी कर्नाटक सरकार ठामपणे उभे आहे.
© IE Online Media Services (P) Ltd