“मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत.” अशा शब्दांत ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला खडसावले. लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या ‘फैज उत्सवा’त एका प्रश्नाचे उत्तर देताना अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतामध्ये ज्याप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांचे आपुलकीने स्वागत झाले, तसे पाकिस्तानात झाले नाही याची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली. जावेद अख्तर यांच्या या कृतीवरून ठाकरे गटाने भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कधीकाळी लाहोरवरही तिरंगा फडकत होताच. शायर फैज अहमद फैज यांच्या लाहोरमधील स्मृती समारोहाच्या निमित्ताने जावेद अख्तर महोदयांनी तो पुन्हा फडकवला. संघ परिवारातील, भाजपवाल्यांतील एखाद्याने पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे चढाई करण्याची हिंमत दाखवावी. फुकटचे बुडबुडे इकडे बसून फोडू नयेत. ५६ इंचांची छाती काय ते जावेद अख्तर यांनी दाखवले. त्यांचे खास अभिनंदन!” असं सामनामधील अग्रेलखातून म्हटलं आहे.

हेही वाचा – “इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं…” जावेद अख्तरांची स्तुती करत संजय राऊतांचा मोदींना टोला!

याचबरोबर “भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवाद आणि देशद्रोहाची व्याख्या वेगळी आहे. जे त्यांच्या पालख्या उचलत नाहीत व जे त्यांचे गुलाम बनायला तयार नाहीत ते सर्व त्यांच्या दृष्टीने देशद्रोही ठरतात. जे मोदीभक्त नाहीत ते देशाचे नाहीत, असे त्यांचे सरळ सरळ मत आहे. मोदी व त्यांच्या हुकूमशाहीवर हंटर चालवणारा एखादा मुसलमान असेल तर विचारूच नका, पण अशाच एका मुस्लिम धर्मीय लेखक-कवीने मोदी व त्यांच्या अंधभक्तांना जमले नाही ते पाकिस्तानात घुसून करून दाखवले. ज्येष्ठ कवी-गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात घुसून पाकडय़ांवर हल्ला केला. शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लाहोरमधील उत्सवात जावेद अख्तर हे निमंत्रित होते. पाकिस्तानने त्यांना ‘व्हिसा’ दिला व लाहोरात येऊ दिले हे विशेष; पण अख्तर यांनी संधीचा योग्य लाभ घेतला व यजमानांना खडे बोल सुनावले. अख्तर यांनी व्यासपीठावरूनच पाकडय़ांना सुनावले की, ‘‘मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. आम्ही मुंबईकर आहोत. आम्ही आमच्या शहरावर झालेला हल्ला पाहिला आहे. हल्लेखोर नॉर्वे किंवा इजिप्तमधून आले नव्हते, ते तुमच्याच देशातून आले होते. त्याबद्दल भारतीय लोकांची तक्रार असेल तर पाकिस्तानी लोकांनी अपमान वाटून घेऊ नये.’’ पाकिस्तानात जाऊन असे ‘खाडकन’ वाजवून बोलणे सोपे नाही. इकडे दिल्ली आणि मुंबईत बसून पाकिस्तानला दम भरणे सोपे आहे.” असा टोलाही लगावला आहे.

आपल्या देशात अशी सहनशीलता व संयम आज उरला आहे काय? –

याशिवाय “निवडणुकीच्या तोंडावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून ‘‘घुस के मारेंगे’’ अशा गर्जनाही होत असतात, पण शत्रूच्या गुहेत शिरून, ‘‘तुम्हीच आमच्या देशाचे हल्लेखोर आहात. सहन कसे करायचे?’’ असे तोंडावर बोलणाराच सच्चा देशभक्त असतो. अख्तर यांनी असेही सांगितले की, ‘‘नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन, गुलाम अली यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांचे भारतात आपुलकीने स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दीच गर्दी झाली, पण पाकिस्तानात लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम कधी आयोजित झाला नाही.’’ जावेद अख्तर यांनी ही जाणीव करून देताच उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. टाळय़ा वाजवून अख्तर यांना दाद देणाऱया श्रोत्यांच्या हिमतीचेही कौतुक करावे लागेल. अख्तर यांनी देशभक्ती व हिमतीची एक ‘मिसाल’ देशासमोर ठेवली. आम्ही सोडून इतर सगळे देशद्रोही या विषारी प्रवृत्तीस जावेद यांनी चपराक मारली आहे. पाकिस्तानच्या श्रोत्यांनी व तेथील आजच्या राज्यकर्त्यांनी जावेद यांचे वक्तव्य सहन केले हे विशेष, पण आपल्या देशात अशी सहनशीलता व संयम आज उरला आहे काय? निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान असे बखेडे उभे करायचे. गोवंश रक्षणाच्या नावाखाली निरपराध मुस्लिम तरुणांना जाळायचे, पण भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे नेते, मंत्री ‘‘आम्ही गोमांस भक्षक आहोत,’’ असे जाहीरपणे बोलत असतात, त्यांच्यावर डोळे वटारायची हिंमत नाही. ” असं म्हणत टीका केली आहे.

पण मोदी फक्त पाकिस्तानला दम भरतात व चीनचे नाव घ्यायला घाबरतात –

“पाकिस्तान हा देशाचा शत्रू आहे तसा तो चीनही आहे, पण मोदी फक्त पाकिस्तानला दम भरतात व चीनचे नाव घ्यायला घाबरतात ही वस्तुस्थिती आहे. काही चिनी ‘ऍप्स’ वगैरेंवर बंदी घातली की, मोदी सरकारचे चीनविरुद्धचे ‘धाडस’ संपते. पाकिस्तान आणि भारतातील सर्वसामान्य मुसलमानांविरोधात मात्र हे लोक सर्रास वातावरण निर्माण करतात. कारण ते सोपे आहे आणि त्यावर यांना त्यांच्या राजकीय पोळय़ाही भाजता येतात. अशा राजकीय पोळय़ा भाजणाऱ्यांना जावेद अख्तर यांनी थेट लाहोरमध्ये जाऊन धक्का दिला. ’’ असंही म्हणत

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Go to pakistan and show courage like javed akhtar thackeray group criticizes modi government msr