उत्तर प्रदेश, दिल्लीनंतर आता कर्नाटकातील मुस्लिम समाजातील दोन विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षिकेने जातीवाचक टिप्पणी केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान, या शिक्षिकेची बदली करण्यात आली असल्याची माहितीही समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकातील शिवमोग्गा येथील टीपू नगर सरकारी शाळेत कन्नड भाषा शिकवणाऱ्या मंजुळा देवी या शिक्षिकेने इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांवर जातीवाचक टिप्पणी केली. हे विद्यार्थी वर्गात भांडत होते. यावरून मंजुळा देवी या वैतागल्या. त्यामुळे, “तुम्ही पाकिस्तानात जा. हा हिंदूंचा देश आहे”, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> VIDEO : “फाळणीदरम्यान पाकिस्तानात का गेला नाहीत?” शिक्षिका भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्यांवर संतापली

शिक्षिकेची केली बदली

दरम्यान, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी परतले. त्यांनी ही घटना त्यांच्या पालकांना सांगितली. याबाबत त्यांनी स्थानिक नेत्यांना कळवले. विद्यार्थ्यांच्या तक्रीरावरून शिवमोग्गा जेडीएस नेते ए नजुल्ला यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटकच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने या शिक्षिकेची बदली केली आहे. परंतु, शिक्षिकेने हा आरोप फेटाळून लावला आहे.

सार्वजनिक सूचना उपसंचालक परमेश्वरप्पा सीआर यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, विभागीय चौकशी बाकी असताना शिक्षकाची बदली करण्यात आली आहे. आम्हाला गुरुवारी तक्रार प्राप्त झाली. ब्लॉक शिक्षणाधिकार्‍यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीच्या आधारे शिक्षकाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शिक्षिका काय म्हणाली?

“प्राथमिक तपासणीदरम्यान शिक्षिकेने सांगितले की ती विद्यार्थ्यांना शिस्त लावत होती. कारण विद्यार्थी वर्गात गोंधळ घालत होते आणि शिक्षकांचा आदर करत नव्हते”, परमेश्वरप्पा म्हणाले.

उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही झाला होता असा प्रकार

मुस्लीम विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांकडून कानाखाली मारण्यात आल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात घडला होता. याप्रकरणानंतर ती खासगी शाळा बंद करण्यात आली आहे. तर, तुम्ही पाकिस्तानात का जात नाहीत, असा सवाल दिल्लीतील एका शाळेत शिक्षिकेने विद्यार्थ्यांना विचारला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच कर्नाटकात हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Go to pakistan karnataka teacher tells muslim students transferred pending departmental inquiry sgk