पेडणे तालुक्यातील अनुदानित शाळेत माध्यान्ह भोजन सेवन केल्यानंतर किमान १९ विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सदर १९ विद्यार्थ्यांपैकी एका मुलीला तुइम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रथमोपचारानंतर घरी पाठविण्यात आले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. भोजन सेवन केल्यानंतर मुलीला उलटय़ा होऊ लागल्या तर अन्य विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले. आता त्या मुलीच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे अधिकारी म्हणाले.
अन्नातून विषबाधा झाल्याने हा प्रकार घडला का त्याची निश्चिती अद्याप झालेली नाही. बाधित विद्यार्थी कमलेश्वर हायस्कूलमधील इयत्ता पाचवी आणि इयत्ता सातवीच्या वर्गातील होते. भोजनात मृतावस्थेतील कोळी आढळला असे प्राथमिक अहवालात म्हटले असले तरी अधिकाऱ्यांनी ती अफवा असल्याचे म्हटले आहे.
माध्यान्ह भोजन पुरविण्याचे कंत्राट ब्रह्मानंदचार्य स्वयंसेवी गट या बिगरशासकीय संस्थेला देण्यात आले असून ती संस्था अन्य १३ प्राथमिक आणि आठ माध्यमिक शाळांना भोजन पुरविते. राज्यात या आठवडय़ात झालेली ही दुसरी घटना आहे.