पावसाळ्यानंतर पश्चिम घाटातील वाघांना गोव्यातील अभयारण्यात वसविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून त्याबाबतची चाचणी मंगळवारपासूनच सुरू करण्यात आली आहे.कॅमेरा ट्रिपिंग पद्धतीचा वापर करून वाघांची छायाचित्रे काढण्यात आली असून त्याचा वापर गोव्यातील अभयारण्यात वाघ असल्याचे सिद्ध करण्यासाठी केला जाणार आहे. या कामाला प्रत्यक्षात पावसाळ्यानंतर सुरुवात होणार असली तरी मंगळवारपासूनच अभयारण्यात त्याबाबतच्या चाचण्या आयोजित केल्या जाणार आहेत, असे उपवनसंरक्षक संजय वराडकर यांनी सांगितले.
अभयारण्यातील १५ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले असून त्याद्वारे ३०० चौ.कि.मी.चे क्षेत्र व्यापले जाणार आहे. पाच दिवस हे कॅमेरे एकाच ठिकाणी बसविण्यात येणार असून त्यानंतर ते अन्य ठिकाणी असलेल्या अभयारण्यात लावले जाणार आहेत. कोटिगाव आणि नेत्रावली येथे प्रथम कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यानंतर ते म्हादेई आणि भगवान महावीर अभयारण्यात बसविण्यात येणार आहेत.
म्हादेई अभयारण्य व्याघ्रप्रकल्प  म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्ताव देण्याच्या सूचना केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने राज्याला केल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. म्हादेई अभयारण्यात वाघांची छायाचित्रे आढळल्यानंतर केंद्र सरकारने याबाबत सूचना दिल्या.

Story img Loader