गोवा विधानसभेतील भाजपचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांना गुरुवारी रात्री काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर वाघ यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे कार्यकर्ते भाजपचेच असल्याचे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या हल्ल्याचा निषेध करून मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निळकंठ हलर्णकर यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात वाघ हे गुरुवारी रात्री उपस्थित होते, तेथून परतत असताना रेवोडा गावाजवळ ६० ते ७० कार्यकर्त्यांच्या जमावाने त्यांना गाडीतून बाहेर काढले व धक्काबुक्की केली.
यात जखमी झालेल्या वाघ यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाघ यांच्या प्रकृतीला धोका नाही, मात्र त्यांचा रक्तदाब वाढला असल्याने त्यांच्या प्रकृतीकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, असे डॉक्टरांनी सांगितले.
या हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाघ हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून आगामी लोकसभा निवडणूक ते राष्ट्रवादीकडून लढविणार आहेत, अशी चर्चा सुरू असल्याने भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे समजते. दरम्यान, पर्रिकर यांच्याकडेच गृहखाते असल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी हलर्णकर यांनी केली, तर लोकप्रतिनिधीवर हल्ला होण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना आहे, पर्रिकर यांच्या राजवटीत सर्वसामान्य माणूसच काय आमदारही सुरक्षित नाही, हे यामुळे सिद्ध झाले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नाडिस यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2013 रोजी प्रकाशित
गोव्यातील भाजपच्या आमदारास धक्काबुक्की
गोवा विधानसभेतील भाजपचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांना गुरुवारी रात्री काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर वाघ यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
First published on: 21-12-2013 at 01:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa bjp legislator manhandled hospitalised