अमेरिकेतील प्लेबॉय क्लबला गोव्यात कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर शाखा उघडू देण्याचा विचार सत्तारूढ भाजप करीत असला तरी पक्षातूनच त्याविरोधात तीव्र स्वर उमटू लागला आहे. काँग्रेसनेही या क्लबला विरोध केला आहे.
प्लेबॉय क्लबचा प्रस्ताव गोवा पर्यटन खात्याच्या विचाराधीन असतानाच पक्षातून विरोध सुरू झाला आहे. गोवा विधानसभेच्या अधिवेशनात पक्षाचेच आमदार मायकेल लोबो यांनी मंगळवारी या मुद्दय़ावर लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना याप्रकरणी सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे विधानसभेत जाहीर करावे लागले होते.
भाजपचे गोवा शाखेचे प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी सांगितले की, या क्लबला भाजपचे समर्थन नाही. भाजपचे आमदार लोबो यांनी अश्लील पर्यटनाला चालना देणाऱ्या या क्लबला परवानगी मिळाली तर उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. लोबो यांच्या भावनेची आम्ही दखल घेतली असून सरकारशी बोलणार आहोत, असे मिस्किता यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आरती मेहरा याही उपस्थित होत्या. नैतिकतेला छेद देणाऱ्या कोणत्याही गोष्टीचे भाजप समर्थन करीत नाही, असे मिस्किता यांनी सांगितले. पुढील दहा वर्षांत भारतात १२० क्लब, हॉटेल्स, फॅशन कॅफे आणि दुकाने उघडण्याची घोषणा प्लेबॉयने गेल्या वर्षी केली आहे. त्यातील गोव्यातील कांदोळी किनाऱ्याचे नावही त्यांनी जाहीर केले होते.
काय असते त्यात?
‘ह्य़ू हेफ्नर’ यांनी प्ले बॉय मासिकाची लोकप्रियता जगभरामध्ये तुडुंब असताना १९६०-७०च्या दशकामध्ये अमेरिकेत ‘प्ले बॉय क्लब्स’ची निर्मिती केली. श्रीमंत, उच्चभ्रू, अय्याशांचे आगर म्हणूून या क्लब्सनी नाव कमावले. मादक ललनांच्या ताफ्यांमुळे या क्लबनी पृथ्वीवर समांतर स्वर्ग निर्माण केल्याची चर्चा होऊ लागली.