गोव्यातील काणकोण येथील इमारतदुर्घटनेनंतर लगतच्या तीन धोकादायक इमारती पुढील चार दिवसांत पाडण्यात येणार आहेत. या इमारती बांधणारे तिघे भागीदार फरारी असून या इमारतीला परवानगी देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांस अटक झाली असून अन्य काही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पणजीपासून ७० किलोमीटरवर असलेल्या काणकोणमधील बांधकाम सुरू असलेल्या या पाचमजली इमारतीत ८० सदनिका होत्या. गोव्यातील ही पहिलीच इमारतदुर्घटना असून त्यात १७ जण ठार तर अनेक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नगर नियोजन खात्यातील सहायक अधिकारी प्रकाश बांदोडकर यांना सोमवारी रात्री अटक केली. महापालिकेचे अभियंते अजय देसाई हे ‘बेपत्ता’ आहेत. इमारतीच्या बांधकामाबाबतचा अहवाल न मागताच या अधिकाऱ्यांनी इमारतीला परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. ही इमारत बांधत असलेल्या ‘भारत रीअ‍ॅलेटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’ या कंपनीचे जयदीप सैगल, प्रदीपसिंग बिरिंग आणि विश्वास देसाई या तिघा भागीदारांविरोधातही पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्यांचाही ठावठिकाणा लागलेला नाही.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली आणखी कोणी जिवंत आढळण्याची शक्यता पूर्ण मावळली आहे. या इमारतीचा पायाच सदोष होता तसेच बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले होते, त्यामुळेच इमारत कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजूच्या इमारतींचीही तीच गत असून त्यामुळेच त्या पाडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी अहवाल देण्याचा आदेश गोवा मानवी हक्क आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे.

Story img Loader