गोवा काँग्रेसने बुधवारी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची पोरिम विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केले आहे. गेली पाच दशके त्यांनी या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर आता त्यांचा मुलगा आणि भाजपा नेते विश्वजित राणे यांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितले आहे. तुम्ही निवृत्त व्हा नाहीतर मी तुमच्या विरोधात भाजपामधून लढेन, असेही विश्वजित राणे यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतापसिंह राणे यांनी मंगळवारी जाहीरपणे आपण आगामी निवडणुका लढविणार असल्याची घोषणा केली. यावेळी प्रतापसिंह राणे यांनी दावा केला की त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी निवडणुकीत उभे राहण्यास सांगितले होते. मात्र, राणेंच्या मुलाने त्यांच्या या घोषणेचा निषेध केला. वडिलांनी राजकारणातून सभ्यपणे निवृत्ती घेणे चांगले होईल, असे ते म्हणाले.

बुधवारी विश्वजित राणे यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आता कोणतीही चर्चा होणार नाही. मला प्रचारही करावा लागत नाही. मला फक्त जिंकण्याचा आत्मविश्वास नाही तर प्रतापसिंह राणे तिसर्‍या क्रमांकावर येतील याची मला भिती वाटते.”

पोरीममधून त्यांच्या उमेदवारीला भाजपाचा पाठिंबा असल्याचे विश्वजित राणे म्हणाले. “माझा पक्ष मला पूर्ण पाठिंबा देत आहे. ते असं का करणार नाहीत? ते अशी जागा जिंकणार आहेत जी त्यांनी कधीही जिंकली नाही,” असे विश्वजित राणे म्हणाले.

प्रतापसिंह राणे यांची उमेदवारी एआयसीसीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी जाहीर केली आणि आगामी निवडणुकीसाठी पक्षाने जाहीर केलेला आठवा उमेदवार ठरला. वडिलांनी तरीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास मी भाजपाच्या तिकिटावर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवू, असा इशारा त्यांच्या मुलाने दिल्यानंतर राणेंची ही घोषणा झाली.

८३ वर्षीय प्रतापसिंह राणे यांनी ८ डिसेंबर रोजी काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगितले होते. भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला लवकरच प्रतापसिंह राणेंचा आशीर्वाद मिळेल, असे म्हटले होते. प्रतापसिंह राणे हे गोव्याचे सर्वाधिक काळ राहिलेले आमदार आहेत. १९७२ पासून त्यांनी १० विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. प्रतापसिंग यांनी १९८० ते २००७ दरम्यान सहा टर्ममध्ये १६ वर्षांपेक्षा कमी काळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रमही केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa cong ex cm pratapsingh rane from poreim son says defeat him for bjp abn