निवडणुकीनंतरच्या काळात कोणती राजकीय समीकरणे जुळवायची, याचा वेध आतापासूनच घेण्यात काही चलाख राजकारण्यांनी सुरुवात केली असून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्यातच राहावे, अशी ‘इच्छावजा सूचना’ गोव्याचेच उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी बुधवारी व्यक्त केली.  
  डिसोझा यांनी असे वक्तव्य केल्यामुळे गोव्यातील राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून डिसोझा यांच्या या ‘सूचने’चा बोलविता नेमका धनी कोण आहे, याचा शोधही सुरू झाला आहे.
‘‘मला कोणी स्वार्थी म्हटले तरी पर्वा नाही, परंतु पर्रिकर यांनी गोव्यातच राहावे, अशी आपली इच्छा आहे,’’ असे फ्रान्सिस डिसोझा यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यास पर्रिकर यांना केंद्रीय मंत्रिपदाची बढती मिळणार काय, असा प्रश्न डिसोझा यांना विचारण्यात आला होता. त्यावर डिसोझा यांनी हे मत मांडले.  
विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी हे जानेवारी महिन्यात गोव्यात आले असता, पर्रिकर यांच्यात अर्थमंत्रिपद सांभाळण्याची क्षमता आहे, असे मोदी यांनी खुलेपणाने सांगितले होते. मोदी जेव्हा पर्रिकर यांच्याबद्दल असे म्हणतात, तेव्हा आपल्याला अभिमानच वाटतो, असे सांगण्यास डिसोझा विसरले नाहीत.
पर्रिकर यांच्यात असे पद सांभाळण्याची क्षमता आहे, असेही डिसोझा म्हणाले. पर्रिकर हे राज्याचे अर्थमंत्रिपद उत्तमरीत्या सांभाळतात, परंतु केंद्रातील अर्थमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांना १.२ अब्ज लोकांना सांभाळावे लागेल, याकडे डिसोझा यांनी लक्ष वेधले.

Story img Loader