गोव्यामध्ये सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक हल्ला व विनयभंग प्रकरणावरून अडकलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळण्यात आला. ७ व ८ नोव्हेंबरला गोव्यातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. न्या. सुनीता गुप्ता यांनी गोवा पोलिसांच्या वकिलाला उत्तर देण्यास सांगितले आहे. जर त्यांनी काही उत्तर दिले, तर तेजपाल यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी पुन्हा सुनावणी होईल. दरम्यान, तेजपाल यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी गोवा पोलिसांनी ‘इमिग्रेशन चेकपोस्ट अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे.
 दिल्ली पोलिसांनी तेजपाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला. यातील प्राथमिक माहिती अहवाल हा राजकीय हेतूने प्रेरित असून गोव्याचे मुख्यमंत्री यात अनावश्यक स्वारस्य दाखवीत आहेत, असे तेजपाल यांनी म्हटले होते.
गोवा पोलिसांच्या वकिलाने सांगितले, की तेजपाल यांच्यावरील आरोप गंभीर असून त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, त्याचबरोबर पीडित पत्रकार महिलेने दाखल केलेल्या याचिकेची प्रत मिळाली नसल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, तहलकाचे संपादक तरुण तेजपाल व व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांना अटक करावी, अशी मागणी गोवा राज्य महिला आयोगाने केली आहे. दरम्यान, गोवा पोलिसांचे एक पथक मंगळवारी महिला पत्रकाराची बाजू नोंदवून घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत आले. मुंबई येथील निवासस्थानी पीडित महिलेचे निवेदन नोंदवून घेण्यात आले.
तेजपाल उच्चपदस्थ व प्रतिष्ठित असल्याने तक्रार करण्यास विलंब झाला, असे या तरुणीने पोलिसांना सांगितले. या पीडित महिलेने नुकताच ‘तहलका’चा राजीनामा दिला. गोवा पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालात तरुण तेजपाल यांच्यावर कलम ३७६ (बलात्कार). ३७६-२ (के) (अधिकाराचा गैरवापर करून बलात्कार करणे) असे आरोप ठेवले आहेत. ३५४(विनयभंग) हा आरोपही ठेवला आहे.

तेजपाल म्हणतात..
किरकोळ एक- दोन प्रसंगांवरून हे अर्थ काढण्यात आले आहेत. गोव्यातील हयात हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने काय झाले जाणून घेता येईल, ते गोवा पोलिसांच्या आवाक्यात आहे पण त्याकडे तपास संस्था दुर्लक्ष करीत आहे. ८ नोव्हेंबर २०१३ रोजी पीडित मुलीशी भेट झाली ती काही सेकंदांची होती, त्यात दखलपात्र गुन्हा म्हणता येईल असे काही घडले नव्हते. गोव्यातील वास्तव्यात सदर तरुणी व्यवस्थित होती व मैत्रीपूर्ण स्थितीतच राहात होती. प्रत्येक पार्टीला तिची हजेरी असायची, रात्री उशिरापर्यंत ती बाहेरच असे. सदर महिलेची तक्रार ही हेतूने प्रेरित, चुकीची व पश्चातबुद्धी आहे. दहा दिवसांनी या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. व्यवस्थापकीय संपादकांनी अर्जदाराचे म्हणणे ऐकून न घेता तहलकाच्या हितासाठी निर्णय घेत असल्याचे तेजपाल यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे.

हे प्रकरण म्हणजे राजकीय लढाई बनली आहे. त्यामुळे  तेजपाल संरक्षणास पात्र आहेत. विनयभंग (कलम ३५४)चे प्रकरण हे काल्पनिक पद्धतीने कलम ३७६ म्हणजे बलात्काराचे प्रकरण केले आहे. पीडित मुलीनेही पोलिसांना याबाबत काही सांगितलेले नाही.
– के. टी. एस. तुलसी, तेजपाल यांच्या वकील़