Lavoo Mamledar : गोव्याचे माजी आमदार तथा काँग्रेस नेते लवू मामलेदार यांचा शनिवारी बेळगाव येथे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लवू मामलेदार यांचं एका रिक्षा चालकाशी झालेल्या भांडणानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात आता कर्नाटक पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. लवू मामलेदार हे बेळगावी येथे व्यवसायाच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

माजी आमदार लवू मामलेदार कर्नाटकातील बेळगावी या ठिकाणी शनिवारी आले होते. मात्र, यावेळी लवू मामलेदार यांचा एका रिक्षा चालकाबरोबर किरकोळ वाद झाला. या वादात रिक्षा चालकाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २०१२ ते २०१७ या कालावधीत पोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मामलेदार (६८) यांनी खडे बाजार येथे एक हॉटेल बूक केलं होतं. तेव्हा त्या ठिकाणी जात असताना त्ंयांची कार परिसरातील एका अरुंद गल्लीतून जात असताना एका रिक्षा चालकामध्ये बाचाबाची झाली. यावेळी रिक्षा चालकाने मामलेदार यांना मारहाण केली. त्यानंतर लवू मामलेदार हे हॉटेलमध्ये पायऱ्या चढत असताना अचानक खाली कोसळले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. बेळगावीच्या डीसीपींनी या घटनेबाबतची माहिती देताना सांगितलं की, “मामलेदार यांची कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या धडकेने ही घटना घडली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत ऑटोचालकाने मामलेदार यांना एक थप्पड मारली. त्यानंतर काही वेळाने मामलेदार हॉटेलमध्ये पायऱ्या चढत असताना ते अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे”, अशी माहिती डीसीपींनी दिली.

Story img Loader