गोव्यातील पर्यटनाला चांगला वाव मिळावा म्हणून गोवा पर्यटन विभागातर्फे नवीन बससेवेची सुरुवात करण्यात आली. बहुप्रतिक्षित अशा ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवेचा गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगांवकरांच्या हस्ते पंजिम येथील पर्यटन भवनात शुभारंभ करण्यात आला. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या बसमधून प्रवास करत गोव्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणेस्थित ‘प्रसन्न पर्पल ग्रुप’च्या सहयोगाने गोवा पर्यटन विकास महामंडळाने या आरामदायी आणि अलिशान बससेवेची सुरुवात केली आहे. ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ (एचओएचओ – होहो) नावाने सुरू झालेल्या या लाल रंगाच्या शाही बसमध्ये बसवून पर्यटकांना गोव्याची सफर घडविण्यात येईल. ‘ओपन टॉप डबल डेकर’ आणि ‘हायडेक’ स्वरुपातील या बस आहेत. पंजिम, मिरामार आणि दोना पावला परिसरातील प्रसिध्द पर्यटनस्थळांचा समावेश सुरुवातीच्या टप्प्यात करण्यात आला आहे. गोव्यातील पर्यटन भवनातून सुरू होणारी ही आरामदायी, शानदार आणि आलिशान सफर पणजिम चर्च, पॅलेस ऑफ आर्च बिशप, मिरामार बिच, गोवा सायन्स सेंटर, दोना पावला, कला अॅकॅडमी, भगवान महावीर गार्डन, पणजिम मार्केट, कॅसिनो पॉइंट, रिव्हर क्रुझ पॉइंट, गोवा स्टेट म्युझिअम, रविंद्रनाथ पट्टो सर्कल अशा विविध पर्यटनस्थळांना भेट देत शेवटी पर्यटन भवनात येऊन संपेल.

स्थानिक भाषेसह विविध भाषेत पर्यटनस्थळांची माहिती, सीसीटीव्ही, जीपीएस ट्रॅकिंग, प्रशिक्षित टुर गाईड, पर्यटकांसाठी समन्वयक अशी विविध वैशिष्ट्ये असलेली ही बस सेवा दर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत चालविण्यात येईल. दोन वेगळ्या मार्गिकेवर धावणाऱ्या या बसचे पास एक अथवा दोन दिवस अगोदर मिळू शकतात. नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा अधिकाधिक पर्यटकांनी लाभ घ्यावा आणि या सेवेस चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी सुरुवातीला पासाची किंमत केवळ ३०० रुपये माणशी इतकी ठेवण्यात आली आहे.
पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी सुरू करण्यात आलेली डबल डेकर बस गोव्यातील पर्यटकांसोबतच स्थानिकांमध्येदेखील मुख्य आकर्षणाचा विषय ठरणार असल्याचे सांगत अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण सुविधा राज्याला वेगळी ओळख निर्माण करून देतील. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधेला आमचे प्राधान्य असेल. या कल्पक योजनेमुळे गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, यामुळे अनेक पर्यटक गोव्याकडे आकर्षित होऊन गोवा टुरिझमला यश प्राप्त होईल, असा विश्वास गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर अजगांवकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ‘हॉप ऑन हॉप ऑफ’मध्ये सुरुवातीला चार बसचा समावेश करण्यात आला असून, पुढील वर्षात आणखी सहा बसची भर पडणार आहे.