गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होऊ घातला असून राज्यातील खाण उद्योगात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाची गडद सावली या महोत्सवावर पडली आहे.
या महोत्सवानिमित्त राज्याच्या विविध भागांत विशेष कार्यक्रम करण्याची योजना संयोजकांनी आखली होती. मात्र या कार्यक्रमांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेच प्रमाण आणखी वाढवावे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
गोव्यातील खनिजांच्या निर्यातीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आल्यामुळे राज्यातील खाण व्यवसाय मंदावला असून अर्थव्यवस्थाही अडचणीत आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्च म्हणजे पैशांची उधळपट्टीच असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. राज्यातील अर्थव्यवस्था संकटात असताना असे उपक्रम रोखले पाहिजेत, असे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. खाण उद्योगातील पेचप्रसंगामुळे कोणताही उत्सव साजरा करण्याची गोव्याची मन:स्थिती नाही, असेही ते म्हणाले.
महोत्सवाच्या कालावधीत राज्यातील १६ किनाऱ्यांवर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्रपटही दाखविण्यात येतील. आम्हाला खरे म्हणजे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करायचे होते परंतु हे कार्यक्रम आता थोडक्यात करण्यात येणार असल्याची माहिती गोवा सरकारच्या अखत्यारीतील ‘एण्टरटेनमेण्ट सोसायटी ऑफ गोवा’ या संस्थेचे उपाध्यक्ष विष्णु वाघ यांनी दिली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांचे नृत्य, गायन होईल, असे ते म्हणाले.