तहलकाचा माजी संपादक तरूण तेजपाल याच्याविरोधात एका एनजीओने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना एक पत्र लिहिले आहे. गोव्यातील निवासी विभागात तरूण तेजपाल चालवत असलेले हॉटेल बेकायदा आहे अशी तक्रार या पत्रात करण्यात आली आहे. एवढेच नाही तर तरूण तेजपालच्या हॉटेलमुळे ध्वनी प्रदूषण वाढीस लागले असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हॉटेल चालविण्यासाठी तरूण तेजपालने ग्रामपंचायतीकडून कोणतीही संमती घेतलेली नाही अशी माहिती एनजीओच्या प्रमुख तारा केरकर यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली आहे. एवढेच नाही तर तरूण तेजपाल चालवत असलेले हॉटेल बेकायदा असूनही त्याविरोधात कोणतीही कारवाई अजून का करण्यात आली नाही असाही प्रश्न केरकर यांनी उपस्थित केला आहे. उत्तर गोवा भागात असलेल्या मोईरा गावात तरूण तेजपालने हॉटेल सुरू केले आहे. मात्र हे हॉटेल बेकायदा असून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोव्यातील एनजीओतर्फे करण्यात आली आहे.
कोण आहे तरूण तेजपाल?
तरूण तेजपाल हा तहलका मासिकाचा माजी संपादक आहे
नोव्हेंबर २०१३ मध्ये गोवा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप
पोलिसांकडून तरूण तेजपालविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल
विनयभंग, बलात्कार आणि पदाचा गैरवापर या गुन्ह्यांची कलमे तेजपालवर दाखल
गुरूवारीच गोवा येथील न्यायालयात याप्रकरणी सुनावणी
तरूण तेजपालवर बलात्कार आणि विनयभंग असे गंभीर आरोप आहेत. गोवा येथील न्यायालयात तरूण तेजपालविरोधात २८ सप्टेंबर रोजी आरोप निश्चित होणार आहेत. अशात आता त्याच्या बेकायदा हॉटेलचाही प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तरूण तेजपालच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.