गेल्या दहा दिवसांपासून अटक टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना अखेरीस शनिवारी अटक करण्यात आली. त्यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर गोवा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले.
गोव्यात नुकत्याच झालेल्या ‘थिंकफेस्ट’ या कार्यक्रमादरम्यान तेजपाल यांनी त्यांच्या महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या महिलेने गोवा पोलिसांसमोर तसा जबाबही दिला. गेल्या दहा दिवसांपासून तेजपाल यांनी अटक टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अटक टाळण्यासाठी जामीनअर्जही सादर केला. मात्र, शनिवारी येथील सत्र न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळून लावत अटकेचे आदेश दिले. शनिवारी दिवसभर तेजपाल यांच्या जामीनअर्जावर काथ्याकूट झाला. त्यांच्या वकील गीता लुथरा यांनी तेजपाल यांना हेतुपुरस्सररित्या लक्ष्य केले जात असल्याचे सांगत जामीनअर्ज मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, सरकारी वकील सुरेश लोटलीकर यांनी जोरदार युक्तिवाद करत लुथरा यांचे म्हणणे खोडून काढले. गुन्हा घडल्यापासून तेजपाल सातत्याने जबाब फिरवत आहेत. उलटपक्षी पीडित तरुणी तिच्या आरोपांवर ठाम आहे. तेजपाल सरडय़ासारखा रंग बदलत असल्याचे लोटलीकर म्हणाले. युक्तिवाद ऐकून झाल्यानंतर न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी सायंकाळी उशिरा तेजपालांचा जामीनअर्ज फेटाळून लावला. त्यानंतर गोवा पोलिसांनी तेजपाल यांना अटक केली.
काळा झेंडा भिरकावला
युक्तिवादादरम्यान तेजपाल न्यायालयात होते. न्यायालयातून बाहेर पडत असताना एका निदर्शकाने त्यांच्या दिशेने काळा झेंडा फेकून मारला. मात्र, तेजपाल यांनी गाडीत बसताना त्याचा फटका चुकवला.
*तरुण तेजपाल यांनी सहकारी महिला पत्रकाराशी केलेले गैरवर्तन सकृतदर्शनी तरी बलात्कारच आहे. त्यामुळे त्यांचा जाबजबाब नोंदवून घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवणेच योग्य ठरेल.
सुरेश लोटलीकर, सरकारी वकील.