प्रतिवर्षी तब्बल २४ लाख पर्यटकांचे आकर्षणबिंदू असलेल्या गोव्यात प्लेबॉय क्लबची स्थापना करण्यास गोवा सरकारने विरोध केला आहे. या क्लबमुळे गोव्यातील संस्कृती धोक्यात येईल असा प्रचार केला जात होता. प्लेबॉय क्लबच्या स्थापनेला विरोध करण्यासाठी गोवा सरकारने तांत्रिक कारण पुढे केले आहे.
अमेरिकेतील प्लेबॉय क्लबने गोव्यातील पर्यटकांची गर्दी लक्षात घेत कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर या क्लबची स्थापना करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीला सत्ताधारी भाजपमधूनच विरोध होत होता. या क्लबमुळे  गोव्यातील सांस्कृतिक जीवन धोक्यात येईल. तसेच येथे लैंगिक स्वैराचार फोफावेल त्यामुळे भाजपच्या सर्वच आमदारांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. येथील सामाजिक संस्था तसेच सामान्य नागरिकांनीही क्लबच्या प्रस्तावाला विरोध केला होता. या सर्व पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्लेबॉय क्लबचा प्रस्ताव ‘तांत्रिक कारणा’ने धुडकावण्यात येत असल्याचे सोमवारी जाहीर केले.
वस्तुत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर छोटे छोटे क्लब सुरू करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवाना देता येत नाही. येथील कायद्यानुसार त्याला बंदी आहे. त्यामुळे प्लेबॉय क्लब ही एक कंपनी असल्यामुळे या तांत्रिक मुद्दय़ावर त्यांच्या क्लबला परवानगी देता येत नसल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले आहे.