समुद्रकिनाऱ्यांवर मनमुराद आनंद लुटण्यासाठी गोव्याकडे आकर्षित होणारा पर्यटक पावसाळ्यात याच समुद्रकिनाऱ्यांकडे पाठ फिरवितो. त्यामुळे पावसाळ्यात गोव्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा पर्यटन उद्योग पुढे सरसावला आहे.
पावसाळ्यात गोव्यात देशी पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी जून महिन्याच्या पूर्वार्धात रोड-शो आणि प्रसिद्धी कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. आठ राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन संचालक निखिल देसाई यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या मोसमासाठी खासगी आणि सरकारी हॉटेलचालकांनी विशिष्ट पॅकेज जाहीर केली आहेत. म्हादेई अभयारण्यात व्हाइट वॉटर राफ्टिंगसारखी नवी आकर्षणे पर्यटकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत, असे गोवा पर्यटन विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जाणार असून प्रचार आणि सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा वापरही करण्यात येणार आहे. फेसबुकवर विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना गोव्यात विशेष पॅकेजचा लाभ मिळणार आहे.

Story img Loader