प्रभू श्रीराम यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम केले. आपण श्रीराम यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. तसेच त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे आपण समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील अहिरौली या गावत साधूंच्या परिषदेला संबोधित करत होते.
प्रभू श्रीराम यांनी नेहमीच सामाजिक एकतेचा मार्ग अंगिकारलेला आहे. श्रीराम यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारताला एकत्र ठेवण्याचे काम केले. त्यांनी समातील प्रत्येक घटकाला जोडण्याचासाठी प्रयत्न केले. आपण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. सामाजिक ऐक्यासाठी आपण काम केले पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले.
बिहारमधील अहिरौली येथे एकूण नऊ दिवसांच्या ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र महाकुंभ’ या नावाखाली धार्मिक परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला मंगळवारी मोहन भागवत यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आगामी काळात या कार्यक्रमात भाजपाशासित राज्यांमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच काही राज्यांचे राज्यपालदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोमवारी या ९ दिवसीय परिषदेस सुरुवात झालेली आहे.