Tirupati Laddu Row : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात माशांचा तेलाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आंध्र प्रदेशमध्ये राजकारणही तापलं आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एक विधान केलंय. प्रसादाविषयी मी खरं बोलावं, अशी परमेश्वराची इच्छा होती, असं ते म्हणाले.

एन.चंद्राबाबू नायडू म्हणाले, मला असं वाटतं की मी त्यांच्या लाडू प्रसादाविषयी बोलावं अशी परमेश्वराची इच्छा होती.आपण फक्त साधन आहोत, परमेश्वर सर्व काही करतो. माझा ठाम विश्वास आहे. रिव्हर्स टेंडरिंगच्या नावाखाली ते तुपाच्या गुणवत्तेशी तडजोड कशी करू शकतात? गुणवत्तेसोबतच पवित्र आचरण आणि कोट्यवधि भाविकांच्या भावना जपण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा हा विषयआहे. कोणीही भावना, पंरपरा आणि धार्मिक प्रथांशी खेळू शकत नाही.” तसंच, मंदिरात भेसळयुक्त तूप पुरवणाऱ्यांना राज्य सरकार सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा >> “माशांच्या तेलाची किंमत…”; तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूसाठी तूप पुरवणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण!

गायीच्या तुपाची किंमत ३२० रुपये कशी?

वायएसआरसीपीवर टीका करताना ते म्हणाले, “गाय तुपाची किंमत किलोमागे ३२० रुपये कशी काय? भगवान व्यंकटेश्वराला अर्पण केलेले लाडू बनवताना रिव्हर्स टेंडर्स काय करायचे? आपली चूक मान्य करण्याऐवजी ते निर्लज्जपणे याला राजकारण कसे म्हणू शकतात?

एनडीए सरकार मंदिरांचं पावित्र्य आणि भक्तांच्या भावना जपण्याला खूप महत्त्व देतं. प्रत्येक धर्माची स्वतःची परंपरा आणि चालीरिती आहेत. त्यांचं संरक्षण करणं आवश्य आहे”, असंहीचंद्राबाबू नायडू म्हणाले. वायएसआरपीसीच्या राजवटीत मंदिरांमध्ये झालेल्या अनेक गैरकृत्यांकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर टीटीडीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आलीहोती. नवीन कार्यकारी अधिकाऱ्यांनी अनेक पुरवठादारांना काळ्यात टाकलं आहे. तर, मंदिराच्या स्वच्छतेकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिलंय, असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.

“आमच्यावरील आरोप हास्यास्पद”

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने कायदेशीर कारवाई सुरू केल्याच्या एक दिवसानंतर कंपनीने या आरोपांचे खंडन केलं आहे. यासंदर्भात कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख कानन यांनी शुक्रवारी एका तामिळ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. “खरं तर आमच्या कंपनीवर झालेले आरोप चुकीचे आहे. कारण माशांचे तेल तुपापेक्षा महाग आहे. तसेच अशी कोणतीही भेसळ जर तुपात केली, तर नुसत्या वासावरून ती ओळखता येऊ शकते, त्यामुळे हे आरोप हास्यास्पद आहे”, असे ते म्हणाले.