Godhra Book : राजस्थान सरकारने त्यांच्या राज्यातील शाळांमध्ये शिकवल्या जाणारी पाठ्यपुस्तकं मागे घेतली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये गोध्रा प्रकरणाचा उल्लेख आहे. तसंच या प्रकरणात हिंदू आरोपी होते असा उल्लेख आहे. असा उल्लेख असणारी सगळी पुस्तकं राज्य सरकारने मागे घेतली आहेत. तसंच हे पुस्तक शाळांनी खरेदी करु नये असेही निर्देश दिले आहेत.

पुस्तक मागे घेण्याचं कारण काय?

राजस्थानमध्ये भाजपाच्या आधी असलेल्या गहलोत सरकारने म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या सरकारने अदृश्य लोग-उम्मीद और साहस की कहानियाँ या नावाचं पुस्तक राजस्थानच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं होतं. हे पुस्तकच शालेय अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांचं म्हणणं आहे की, “या पुस्तकात गोध्राकांडाबाबत (Godhra Book) खोटी माहिती देण्यात आली आहे. तसंच दोन समाजांमध्ये फूट कशी पडेल याची हेतुपुरस्सर काळजी घेण्यात आली आहे. या पुस्तकात गोध्रा ट्रेन ज्यांनी पेटवली त्यांची बाजू योग्य होती असाही उल्लेख आहे. तसंच हिंदूंची बाजू ही गुन्हेगारांप्रमाणे मांडण्यात आली आहे. गोध्रा प्रकरण घडलं तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी बसले होते. नरेंद्र मोदी यांचीही बदनामी या पुस्तकात करण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”

हे पण वाचा- Anil Deshmukh : फडणवीसांनी काय ऑफर दिली होती? पार्थ पवार, आदित्य ठाकरेंना कसं अडकवायचं होतं? अनिल देशमुखांचे पुस्तकातून धक्कादायक खुलासे

मदन दिलावर यांच्या आरोपांना गोविंद सिंह यांनी काय उत्तर दिलं?

मदन दिलावर यांनी या पुस्तकाप्रकरणी गोविंद सिंह डोटासरा यांच्यावर आरोप केले आहेत. गोविंद सिंह यांनी जाणीवपूर्वक हे पुस्तक मुलांच्या अभ्यासक्रमात घेतले. तर दुसरीकडे गोविंद सिंह यांचं म्हणणं असं आहे की मी कुठल्याही पुस्तकाला ( Godhra Book ) मंजुरी दिली नव्हती. मदन दिलावर माझ्याविरोधात खोटं बोलत आहेत.

पुस्तक वादात का सापडलं?

माजी IAS अधिकारी हर्ष मंदर यांनी हे पुस्तक ( Godhra Book ) लिहिलं आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश या ठिकाणी हर्ष मंदर हे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते एका एनजीओमध्ये काम करत होते. मंदर यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांचे अनुभव लिहिले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की गोध्रा ट्रेनवर झालेला हल्ला हा दहशतवादी कट होता. या कटातून मुस्लिमांना टार्गेट करण्यात आलं. मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांवर खूप अत्याचार करण्यात आले. अनेक मुलंही बेपत्ता झाली आहेत. तर दुसऱ्या धर्माचे लोक ओळख लपवून जगत आहेत असाही उल्लेख या पुस्तकात आहे.