गुजरातमधील गोध्रा येथे कत्तलखान्यात नेत असलेल्या गायींना वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर १०० हून अधिक लोकांच्या जमावाने शनिवारी हल्ला केला. या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना १८ राऊंड अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक व्ही.के.नाई यांनी दिली. ज्या ठिकाणी गायी ठेवण्यात आल्या होत्या. तिथे पोलीस गेल्यानंतर जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी १८ राऊंड अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
मोठ्या प्रमाणात गायी कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथकाने परिसराला घेराव घातला होता. नाई म्हणाले, पोलिसांना तिथे मोठ्या प्रमाणात गायी बांधून ठेवल्याचे दिसले. जेव्हा पोलिसांनी गायींना नेण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा अचानक जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.
आम्ही ४९ गायी ताब्यात घेतल्या असून त्या गोशाळेत पाठवले असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुजरातमध्ये गायींची कत्तल करण्यास बंदी आहे. याचवर्षी या कायद्यात काही बदल करण्यात आले आहेत. आता गोहत्या करणाऱ्याला जन्मठेप आणि पाच लाख रूपयांचा दंड द्यावा लागतो.