नवी दिल्ली : गोध्रा रेल्वे जळीत कांडप्रकरणी ११ दोषींना फाशीची मागणी करणार असल्याचे गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली. गुजरात उच्च न्यायालयाने या प्रकरणी दोषींना जन्मठेप सुनावली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी एस नरसिंह आणि न्या. पी बी पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी ही सुनावणी झाली आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी तीन आठवडय़ांनंतर होणार आहे. अनेक दोषींनी जामिनासाठी याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवरील सुनावणीही त्याच वेळी होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे अतिशय दुर्मीळ प्रकरण आहे, यामध्ये महिला आणि मुलांसह ५९ जणांना जिवंत जाळण्यात आले होते, असा युक्तिवाद महान्यायवादी तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर केला. कनिष्ठ न्यायालयाने ११ दोषींना फाशी आणि इतर २० जणांना जन्मठेप सुनावली होती अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने ११ दोषींची फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेप सुनावली. त्याविरोधात गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोषींना सुनावण्यात आलेली शिक्षा आणि त्यांनी आतापर्यंत तुरुंगात व्यतीत केलेला काळ यासंबंधी तपशील द्यावेत असे न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Godhra train burning case gujarat government seeks death penalty for convicts in supreme court zws