अजामीनपात्र वॉरंट टाळण्यासाठी आश्रमात लपून बसलेले हरयाणातील स्वयंघोषित संत रामपाल याला पकडण्यासाठी मंगळवारी पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान गेले असता आश्रमवासियांनी घडविलेल्या जोरदार धुमश्चक्रीत शंभरजण जखमी झाले असून त्यात सुरक्षा जवान व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. आश्रमात महिला आणि लहान मुलांची मोठी संख्या असल्याने पोलिसांनी अश्रुधूराची नळकांडी फोडून तसेच पाण्याचे फवारे मारत व हवेत गोळीबार करत रामपालसमर्थकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र आश्रमातून दगडफेक, गोळीबार तसेच पेट्रोलबॉम्बची फेक झाल्याने जवान व काही पत्रकार जखमी झाले.
न्यायालयाच्या बेअदबी प्रकरणी रामपाल याला सरकारने शुक्रवापर्यंत न्यायालयात हजर करावे असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यात सोमवारीच पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने नव्याने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. त्यामुळे रामपालला अटक करण्यावाचून हरयाणा सरकारसमोर पर्याय उरला नव्हता.
रामपालच्या समर्थकांनी याआधीही पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे मंगळवारी पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवानही आश्रमात थडकले. या आश्रमाच्या चारही बाजूला ५० फूट उंच भिंती असल्याने कारवाई करणे कठीण जात होते. अश्रुधूराची नळकांडी फोडत असतानाच जेसीबी मशिनच्या मदतीने या भिंती पाडण्यास सुरुवात झाली. काही समर्थकांनी हे मशिनही जाळण्याचा प्रयत्न केला. तरी सायंकाळपर्यंत दोन भिंती पाडल्या गेल्या.  अनेक महिला व मुले आश्रमात अडकून पडली असून काहींनी कशीबशी सुटका करून घेतली आहे. समर्थकांनी काही भक्तांना आश्रमातच डांबूनही ठेवले आहे. रामपाल आजारी असून अज्ञात स्थळी त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे आश्रमातून सांगण्यात आले तरी तो अजूनही आश्रमातच असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना सर्व घडामोडींची कल्पना देण्यात येत आहे, असे पोलिस महासंचालक एस. एन. वशिष्ट यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जामिनावर निकाल राखला
पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे न्या. जेयॉपरॉल व न्या. दर्शन सिंग यांनी रामपाल याच्या २००६ च्या हत्या प्रकरणात जामीन रद्द करण्याबाबत निकाल राखून ठेवला आहे. रामपालला जामीन दिल्यास न्यायसंस्थेची विश्वासार्हता धोक्यात येईल, असा दावा या जामिनाविरोधातील युक्तीवादात केला गेला.

कोण हा रामपाल?
१९५१मध्ये सोनपत येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रामपाल हरयाणा सरकारच्या पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता होता. सेवेतील कुचराईवरून त्याला काढले गेल्याचे बोलले जाते, १८ वर्षांच्या सेवेनंतर ते स्वत:हून निवृत्त झाले, असे त्यांचे समर्थक सांगतात. सेवेत असतानाच १९९९मध्ये त्याने आपला पहिला आश्रम काढला. नंतर आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरयाणात अनेक भागांत आश्रम काढले. २००६ मध्ये दयानंद सरस्वती यांच्याविषयी त्याने मानहानीकारक वक्तव्य केले. त्यानंतर आर्य समाजींविरोधात झालेल्या संघर्षांत एकाची हत्या झाली. तेव्हापासून न्यायालयीन लढाईत रामपाल आला. या हत्येवरून त्याला नंतर जामीन मिळाला पण नंतरच्या ४२ सुनावणींतील गैरहजेरीमुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Godman rampals supporters clash with police many injured in crossfire at hisar ashram