तप्त-संथ अर्थव्यवस्थेत ग्राहकांच्या डोक्यावर स्वस्ताईच्या गारव्याचा रुमाल असावा असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे. हौसेबरोबर गुंतवणूकदार म्हणून मोह न आवरणारे सोने सोमवारी मुंबईच्या सराफा बाजारात पुन्हा जवळपास दीड हजाराने स्वस्त झाले. आठवडय़ाभरापूर्वी ३० हजारांवर असणाऱ्या तोळ्याचा सोन्याचा भाव आता २७ हजार रुपयांच्याही खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचे निमित्त लाभलेल्या सराफा बाजारातील उतरत्या दरांमध्ये सप्ताहारंभी चांदीही किलोमागे एकदम साडेतीन हजारांहून अधिक स्वस्त होत आता ४७ हजारांखाली येऊन ठेपली आहे.
शनिवारची स्टॅण्डर्ड सोन्यातील १० ग्रॅममधील १,२५० रुपयांच्या घटीसह पिवळ्या धातूची चकाकी अवघ्या दोन दिवसांत अडीच हजारांहून अधिक रुपयांनी कमी झाली आहे.
महागाई ६ टक्क्यांच्या आत
घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती कमी झाल्याने मार्चमधील महागाईचा दर ६ टक्क्यांच्या आत विसावला आहे. या कालावधीतील ५.९६ टक्के हा महागाईचा दर डिसेंबर २००९ नंतरचा सर्वात कमी दर आहे. महागाई दर फेब्रुवारी २०१३ मध्ये ६.८४ टक्के तर मार्च २०१२ मध्ये तो ७.६९ टक्के होता. रिझव्र्ह बँकेला व्याजदर कपातीसाठी योग्य अशा पातळीवर हा दर पोहोचल्याने येत्या ३ मे रोजी जाहीर होणाऱ्या वार्षिक पतधोरणात किमान अध्र्या टक्क्याची कपात होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून बळावत आहे. महागाई दर आगामी कालावधीत आणखी उतरताना दिसेल, असा आशावाद नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनीही व्यक्त केला आहे.
पेट्रोल रुपयाने स्वस्त
एका महिन्यात तिसऱ्यांदा पेट्रोलच्या किमती कमी करणारी भेट केंद्र सरकारकडून वाहनचालकांना देण्यात आली आहे. लिटरमागे पेट्रोल एक रुपयाने स्वस्त झाले असून त्याची अंमलबजावणी सोमवार मध्यरात्रीपासूनच लागू झाली आहे. राजधानीत व्हॅट धरून पेट्रोलचे दर लिटरसाठी ६६.०९ (रु. -१.२०) रुपये तर मुंबईत लिटरमागे आता १.२६ रुपये कमी, ७२.८८ रुपये मोजावे लागतील. यापूर्वी याच महिन्याच्या सुरुवातीला ८५ पैसे आणि बरोब्बर महिन्यापूर्वी २ रुपयांनी कमी करण्यात आले होते.
तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये दोन वेळी पेट्रोलच्या किमती जवळपास लिटरमागे तीन रुपयांनी वाढविण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किमती आता १०० डॉलर प्रतिपिंपवर स्थिरावल्या आहेत.
दर घसरणीचा सुवर्णयोग
तप्त-संथ अर्थव्यवस्थेत ग्राहकांच्या डोक्यावर स्वस्ताईच्या गारव्याचा रुमाल असावा असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे. हौसेबरोबर गुंतवणूकदार म्हणून मोह न आवरणारे सोने सोमवारी मुंबईच्या सराफा बाजारात पुन्हा जवळपास दीड हजाराने स्वस्त झाले.
First published on: 16-04-2013 at 04:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold fuel prices down