एकीकडे भारतात उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्य़ात एका पुजाऱ्याला तेथील दिवंगत राजाने गुप्तपणे ठेवलेल्या सोन्याच्या साठय़ाबाबत दृष्टान्त मिळाल्याने तिथे ‘गोल्ड रश’ सुरू झाला असला, अगदी पुरातत्त्व खात्याने उत्खनन सुरू केले असले, तरी ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांना चक्क निलगिरीच्या झाडात सोन्याचे कण सापडले आहेत, सोने पूर्वीच्या काळापासून मौल्यवान धातू मानला जात असून आता सोने मिळवण्यासाठी निलगिरीला महत्त्व येण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्था म्हणजे सीएसआयआरओ या संस्थेच्या संशोधकांनी म्हटले आहे, की जिथे निलगिरीची झाडे असतात तर तिथे सोन्याचा साठा भूमिगत पातळीवर सापडू शकतो. दुष्काळात निलगिरीची रोपे जेव्हा आद्र्रता मिळवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ती सोन्याचे कण शोषून घेतात. याबाबतचे वृत्त ऑस्ट्रलियन प्रसारण संस्थेने दिले आहे.
निलगिरीत सोने असते म्हणून जिथे निलगिरीची झाडे आहेत तिथे बिनधास्तपणे खोदायचे आणि सोन्याची लूट करायची इतका सोपा अर्थ यातून काढता येणार नाही. असे असले तरी निलगिरीच्या पानात सोन्याचे कण सापडले आहेत ही काही कमी महत्त्वाची बाब नाही, असे सीएसआयआरओचे भूरसायनशास्त्रज्ञ मेलविन लिंटर्न यांनी सांगितले.
जी झाडे ३० मीटर खोलीवरून सोने वपर्यंत आणतात, जिची उंची १० मजली इमारतीइतकी आहे, ती सोने सापडवण्यासाठी उपयोगी आहेत असा त्यांचा दावा आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियात कालगुर्ली भागात सोने सापडले होते. १८०० मध्ये ऑस्ट्रेलियात गोल्ड रश होते व सोन्यासाठी लोक तुटून पडत असत. वैज्ञानिकांनी सीएसआयआरओच्या मेलबर्न येथील ऑस्ट्रेलियन सिंक्रोट्रॉन माइया डिटेक्टरच्या मदतीने क्ष किरण प्रतिमा चित्रण केले असता मानवी केसाच्या व्यासाच्या एक पंचंमांश व्यासाइतके लहान सोन्याचे कण सापडले. गेल्या दहा वर्षांत सोन्याचे नवीन साठे शोधण्याचे प्रमाण ४५ टक्के कमी झाले. त्यामुळे सोन्याचे भावही काही प्रमाणात वाढले. डिसेंबर २००० ते मार्च २०१३ पर्यंत सोन्याचे भाव ४८२ टक्के वाढले. २०११ मध्ये अमेरिकी भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने केलेल्या अंदाजानुसार जगात ५१,००० टन इतके सोन्याचे साठे पडून आहेत जे आपल्याला अजून माहिती नाहीत. मानवी संस्कृती अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत १,७४,००० टन इतके सोने माणसाने उत्खनन व प्रक्रिया करून तयार केले आहे.
निलगिरीचे महत्त्व : निलगिरीचे झाड हे जलपंपासारखे काम करते, त्याची मुळे जमिनीत दहा मीटरपेक्षा जास्त पसरतात. ते जमिनीतून पाणी ओढतात व त्या पाण्यात हे सोने असते असे लिंटर्न यांचे मत आहे. झाडांच्या दृष्टीने सोने हे विष असते त्यामुळे ते पाने व फांद्यातून बाहेर टाकले जाते. लिंटर्न यांनी असे सांगितले, की सोन्याचा साठा असलेल्या भूमीवर जर पाचशे झाडे असतील, तर त्यात लग्नात वापरल्या जाणाऱ्या अंगठीइतके सोने सहज मिळू शकते. जमिनीखाली सोने आहे किंवा नाही याचा अंदाज घेण्यासाठी जैवरासायनिक नमुने घेतले जातात. त्यांचे विश्लेषण केले जातात. झाडांच्या पानांमध्ये जे अवशेष असतात, त्याच्या अभ्यासातून भूमीत काय घडत आहेत याचा अंदाज प्रत्यक्ष उत्खनन न करताही करता येतो. कमी किमतीत खनिजे सापडवण्याच्या या पद्धती असून त्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होत नाही. अकाशिया म्युलगा या झाडाच्या पानातही सोन्याचे कण सापडतात, झाडांमध्येच नव्हे तर ज्या वनौषधी झाडाखाली वाढतात, त्यांच्यातही सोन्याचे कण सापडतात.
सोने झाडाला लागते..!
एकीकडे भारतात उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्य़ात एका पुजाऱ्याला तेथील दिवंगत राजाने गुप्तपणे ठेवलेल्या सोन्याच्या साठय़ाबाबत दृष्टान्त मिळाल्याने तिथे ‘गोल्ड रश’ सुरू झाला असला
First published on: 24-10-2013 at 12:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold growing on trees