पंतप्रधानांची ‘मन की बात’; बँकेतील सोन्यावर व्याज; रोखे, मुद्रा बाजारात
आर्थिक विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याची योजना सुरू करण्याचे; तसेच सोन्याची नाणी बाजारात आणण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात रविवारी केली. गेल्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार सोन्याशी निगडित अनेक महत्त्वाच्या योजनाही सरकार बाजारात आणणार आहे. याशिवाय ‘स्वायत्त सुवर्ण रोखे’ आणि अशोकचक्राची मुद्रा असलेली नाणी योजनांच्या माध्यमातून आणली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे धनत्रयोदशीला या योजना कार्यान्वित केल्या जातील. या दिवशी नागरिक सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने सुवर्ण दिवाळी ठरणार आहे.
मोदी म्हणाले, संकटकाळी कामी येणारा पैसा म्हणून सोन्याचे परंपरागत महत्त्व आजही कायम आहे. भारतीयांच्या सामाजिक जीवनाचा सोने हा भाग आहे; पण आर्थिक सुरक्षितता म्हणून सोनेरूपी पैसा एका अर्थाने मृत आहे आणि म्हणूनच सोन्याचा आधार अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरणार नाही. यासाठी हा पिवळा धातू देशवासीयांचे सामथ्र्य ठरला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने त्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने काही रक्कम बँकेत ठेवल्यानंतर त्यावर व्याज मिळविता येते, त्याच धर्तीवर सोने बँकेत ठेवून व्याज मिळविता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader