Gold Found in Pakistan Indus River: गेल्या काही वर्षांत पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याची अनेक प्रकरण समोर आली आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला तीन टप्प्यात आर्थिक मदतीची मोठी योजनाच राबवली असून त्यानुसार पाकिस्तानला सावरण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पाकिस्तानला सिंधू नदीच्या पोटात तब्बल ८० हजार कोटींचं सोन्याचं घबाड सापडलं आहे! फर्स्टपोस्टनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानमधील Dawn या वृत्तसमूहाच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या अटक परिसरात सिधू नदीत हे सोनं सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या ठिकाणी सापडलेल्या सोन्याची किंमत अंदाजे ८० हजार कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे देशांतर्गत आर्थिक स्थिती सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानसाठी ही भलीमोठी लॉटरीच असल्याचं बोललं जात आहे.
सोनं बाहेर काढण्यासाठीची पावलं…
अटक भागात पाकिस्तान सरकारकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणामध्ये हा सोन्याचा साठा सापडल्याचं Dawn नं म्हटल्याचं फर्स्टपोस्टनं आपल्या वृत्तात नमूद केलं आहे. या साठ्याचा शोध लागल्यानंतर तो बाहेर काढण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून पावलं उचलली जात आहेत. कर्जबाजारी पाकिस्तानसाठी हा सोन्याचा साठा मोठा दिलासा ठरण्याची शक्यता आहे.
कोण काढणार सोनं बाहेर?
दरम्यान, पाकिस्तान सरकारकडून या सोनं बाहेर काढण्याचं काम सरकारी संस्थांना देण्यात आलं आहे. त्यात सरकारच्या मालकीची नॅशनल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ऑफ पाकिस्तान अर्थात NESPAK व मॉइन्स अँड मिनरल्स डिपार्टमेंट ऑफ पंजाब अर्थात MMDP या दोन संस्था प्रामुख्याने सोनं बाहेर काढण्याच्या कामात सहभागी असतील.
“अटक जिल्ह्यातील सिंधू नदीमध्ये सोन्याचे एकूण ९ मोठे ब्लॉग सापडले आहेत. या सोन्याच्या लिलावासाठीची कागदपत्र व हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी सल्लागार संस्थांची नियुक्ती केली जाईल आणि त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल”, अशी माहिती NESPAK चे व्यवस्थापकीय संचालक झरगाम इशक खान यांनी Dawn ला दिल्याचं वृत्त फर्स्टपोस्टनं दिलं आहे.
कुठून आलं हे सोनं?
भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हे सोनं प्रामुख्याने हिमालयाच्या कुशीतील साठ्यातून सिंधू नदीच्या पात्रात आल्याची शक्यता आहे. साधारणपणे असं सोनं त्याच्या मूळ स्त्रोतापासून (कठीण खडकातील साठे) झिजून पाण्याने, बर्फाने किंवा वाऱ्याने वाहून नवीन ठिकाणी जमा होते आणि गाळाच्या थरांमध्ये, जसे की नदीखोऱ्यांमध्ये, प्रवाहांमध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यांवर साचते.
पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेनं पाकिस्तान सरकारच्या ताब्यातील सोन्याच्या एकूण साठ्याचं मूल्य ५.३४ बिलियन डॉलर्स इतकं निश्चित केलं आहे. पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती, दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेलं चलन या पार्श्वभूमीवर देशाकडील सोन्याच्या साठ्यामध्ये अधिकाधिक वाढ होणं पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे नव्याने सापडलेल्या या सोन्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.