Donald Trump : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. सोमवारी भारतीय वेळेप्रमाणे रात्री १०.३० च्या सुमारास हा सोहळा पार पडला. राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिलंवहिलं भाषण केलं त्यात ते म्हणाले की अमेरिकेत या क्षणापासून सुवर्ण युग सुरु झालं आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले या क्षणापासून अमेरिकेत सुवर्ण युग सुरु झालं आहे. आता जगातला कुठलाही देश हा आपला वापर करु शकणार नाही. आता आपण आपल्या एकतेसाठी आणि अमेरिकेला महान बनवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या देशात कुठलीही घुसखोरी आता नामंजूर असं म्हणत त्यांनी अमेरिका ग्रेट अगेनचा नारा दिला.

२० जानेवारी हा दिवस म्हणजे अमेरिकेसाठी स्वातंत्र्य दिवस आहे असंच मला वाटतं-ट्रम्प

आजची तारीख म्हणजेच २० जानेवारी हा अमेरिकेसाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे असंच मला वाटतं आहे. आपल्या देशाशी शत्रुत्व घेतलं तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ आणि धडा शिकवू या आशयाचं वक्तव्यही ट्रम्प यांनी केलं. माझ्यावर प्रचारादरम्यान हल्ला झाला होता. मात्र मी वाचलो कारण मला अमेरिकेला खूप पुढे न्यायचं आहे असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेसारखा देश या जगात नाही-ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “अमेरिकेसारखा देश जगात एकही नाही. सगळं जग आपला सन्मान करतं आहे. आपल्याला आणखी समृद्ध व्हायचं आहे हे विसरु नका. जगाला गौरव वाटेल असं राष्ट्र होणं आणि समृद्ध होणं ही आपली सगळ्यांची प्राथमिकता आहे.” असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात केली. तसंच दक्षिण सीमेवर जी घुसखोरी होते आहे ती रोखण्यासाठी लष्कर पाठवलं जाईल अशीही घोषणा ट्रम्प यांनी केली.

हे पण वाचा- Donald Trump Oath Ceremony Updates : अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

आपण जिंकलो, कधीही अपयशी होणार नाही-ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मला लोकांनी निवडून दिलं. लाखो लोकांचं प्रेम मतांच्या रुपांमध्ये मिळालं. सात स्विंग स्टेट्स जिंकले. तसंच आपल्याला हे यश ज्या ईश्वराने दिलं त्यालाही आपण कधीही विसरणार नाही. अमेरिका हा देश कधीही अपयशी होणार नाही हे लक्षात ठेवा, सगळ्यांनी एक व्हा, आपल्याला एकत्र येऊन अमेरिकेला आणखी समृद्ध करायचं आहे. असंही ट्रम्प म्हणाले.

Story img Loader