वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे विजयी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता) शपथ घेतली. शपथ घेतल्यांनतर केलेल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ट्रम्प यांनी २० जानेवारी २०२५ हा स्वातंत्र्य दिवस म्हणून जाहीर केला. यावेळी उपस्थित समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
शपथविधी सोहळ्याला रिपब्लिकन पक्षाचे नेते, माजी राष्ट्राध्यक्ष आणि एलॉन मस्क व जेफ बेझोस यांच्यासारखे प्रभावशाली अब्जाधीश उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व केले. शपथविधीनंतर आणि भाषण सुरू होण्यापूर्वी लोकप्रिय गायिका कॅरी अंडरवूडने ‘‘अमेरिका द ब्युटीफुल’’ हे गीत सादर केले. ट्रम्प यांचा शपथविधी होताच, ‘‘अमेरिकेचे सुवर्णयुग या क्षणापासून सुरू झाले आहे’’ या शब्दांनी ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात केली.
हेही वाचा : देशासाठी वेगाने काम! ‘मेक अमेरिका ग्रेट’ विजय सोहळ्यात डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही
अध्यक्षपदाच्या पहिल्या दिवशी आपण कोणते निर्णय घेणार आहोत ते त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आज मी ऐतिहासिक आदेशांवर स्वाक्षरी करणार आहे. त्यामुळे अमेरिकेचे गतवैभव पुन्हा मिळेल आणि सामान्य व्यवहारज्ञानही पुनर्प्रस्थापित होईल.’’ दक्षिणेकडे मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणी लागू करण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला. ‘‘अमेरिकी जनतेला त्यांचा विश्वास, त्यांची संपत्ती, त्यांची लोकशाही आणि त्यांचे स्वातंत्र्य परत दिले जाईल. या क्षणापासून अमेरिकेचे अध:पतन थांबले आहे. आपल्या देशाचे वैभवशाली भाग्य यापुढे नाकारले जाणार नाही. या दिवसापासून आपल्या देशाची भरभराट होईल आणि त्याचा आदर केला जाईल. मी केवळ अमेरिकेला सर्वाधिक प्राधान्य देईन. अमेरिका पूर्वीपेक्षा अधिक महान, शक्तिशाली आणि कितीतरी अधिक असाधारण देश करू.’’ आपल्या अध्यक्षीय भाषणात ट्रम्प यांनी मावळते अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका केली.
हेही वाचा : दिल्लीसाठी भाजप सज्ज; महाराष्ट्र, हरियाणाच्या धर्तीवर सूक्ष्म नियोजनावर भर
अमेरिकेचे सुवर्णयुग या क्षणापासून सुरू झाले आहे. या क्षणापासून अमेरिकेचे अध:पतन थांबले आहे. अमेरिकेला पूर्वीपेक्षा अधिक महान, शक्तिशाली आणि असाधारण देश करू. यापुढे २० जानेवारी २०२५ हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस असेल. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका